एसआयआर वोट चोरी नाही, राहुल गांधींच्या हेतूवरच फडणवीसांचा निशाणा
एसआयआर आणि वोट चोरीच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रश्न विचारले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी संविधानाची प्रत हातात दाखवत असले, तरी त्यांचा खरा प्लान वेगळाच आहे. संविधान पुढे करून संविधानिक संस्थांची बदनामी करणे हाच त्यांचा हेतू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राहुल गांधींना अशी व्यवस्था तयार करायची आहे, ज्यामुळे लोकांचा संविधानिक संस्थांवरचा विश्वास उडेल आणि देशात अराजकता पसरेल. जनतेला जेव्हा असे वाटेल की सध्याच्या संविधानिक संस्था त्यांना न्याय देऊ शकत नाहीत, तेव्हा या सगळ्या संस्थांना डाव्या विचारसरणीकडे ढकलले जाईल, असे त्यांनी नियोजित डिझाइन असल्याचे फडणवीस म्हणाले.
एसआयआर (SIR) आणि वोट चोरीच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. एसआयआरच्या माध्यमातून जर मतदार हटवले गेले असते, तर मग तृणमूल काँग्रेस (टीएमसी) निवडणूक कशी जिंकली, असा सवाल त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ज्या भागांत एसआयआरमुळे मोठ्या प्रमाणात वोट कमी झाले, अशी किमान 15 क्षेत्र आहेत, जिथे टीएमसी जिंकून आली. जर भाजपने एसआयआरच्या माध्यमातून विरोधी विचारसरणीच्या मतदारांना हटवले असते, तर त्या मतदारसंघांत टीएमसी कशी जिंकली, हा माझा राहुल गांधींना प्रश्न आहे, असे फडणवीस म्हणाले.
एसआयआरबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, या प्रक्रियेत सगळ्यांना संधी मिळते. प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक बूथवर आपला बूथ लेव्हल एजंट म्हणजेच बीएलए नेमू शकतो आणि बीएलएला आक्षेप नोंदवण्याचा अधिकार असतो. मतदार यादीतील प्रत्येक पान आणि प्रत्येक नावावर आक्षेप घेता येतो, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधींवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, कोणतीच वोट चोरी झालेली नाही, पण राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. जर त्यांचा मेंदू चोरीला गेला असेल, तर पंतप्रधानांनी अशी कमिटी नेमावी जी त्यांचा मेंदू शोधून परत आणेल, जेणेकरून ते देशाच्या हितासाठी नेहमी सत्य बोलू शकतील, अशी विनंती फडणवीस यांनी पंतप्रधानांना केली. तसेच राहुल गांधींनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी फक्त विरोधात बोलतात, त्यांना ठाऊक आहे की जनता त्यांना स्विकारत नाही आणि त्यांच्याकडे मुद्देही नाहीत, त्यामुळे विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे फडणवीस म्हणाले.
एसआयआरवर पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एखाद्या पात्र मतदाराचे नाव वगळले गेले तर तो आक्षेप नोंदवू शकतो. एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नसेल तरीही आक्षेप घेता येतो. पण या प्रक्रियेत सहभागच घेतला नाही, तर ही प्रक्रिया कळणार तरी कशी, असा सवाल फडणवीस यांनी केला. प्रक्रियेत पाच ते दहा टक्के गोंधळ झाला किंवा एखाद्याचे नाव नोंदवायचे राहून गेले, तर ती व्यक्ती नंतर आपला आक्षेप नोंदवू शकते, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.