हे लोक देशद्रोही, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन माफीचे साक्षीदार व्हावे: राहुल गांधी यांचा हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांनीच ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर आक्षेप घेतल्याचे समोर आल्यानंतर विरोधी पक्ष महाभियोगाच्या तयारीत आहेत.
नवी दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. स्वातंत्र्यानंतर, म्हणजे 1947 पासून आजवर देशाने अशा प्रकारचे संकट कधीच पाहिले नव्हते, असा इशारा त्यांनी देशातील स्वायत्त संस्था आणि मतांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करताना दिला. मतदार यादीत फेरफार करणे आणि 'मतचोरी' हा देशद्रोह असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा देऊन या प्रकरणात माफीचे साक्षीदार व्हावे, अशी आक्रमक मागणी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील एक ऐतिहासिक उदाहरण दिले. 1971 च्या बांगलादेश युद्धातील मोठ्या विजयानंतरही देशात सत्ताविरोधी लाट आली होती आणि त्यामुळे सत्ताबदल झाला होता, याचा फटका इंदिरा गांधी यांच्या सरकारलाही बसला होता, असे ते म्हणाले. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमध्ये त्या काळात सातत्याने सरकारे बदलली गेली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र भाजपच्या काळात हे चित्र पूर्णपणे बदलले असून सत्ताविरोधी लाट असूनही भाजपला त्याचा फटका का बसत नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. हरियाणातील मतचोरी हे सर्वात गंभीर प्रकरणांपैकी एक असून तिथे झालेली फेरफार अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांची निवड खुद्द पंतप्रधानांनीच केली होती, आणि आता निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांनीच त्यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा देऊन या संपूर्ण प्रकरणात माफीचे साक्षीदार व्हावे, कारण आम्हाला सगळे माहीत आहे हे त्यांनाही चांगले ठाऊक आहे, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला.
मत हा देशाच्या लोकशाहीचा पाया आहे आणि मतांशीच छेडछाड झाली तर संविधानाची ताकद संपुष्टात येते, तसेच संसदेने बनवलेल्या कायद्यांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे राहुल गांधी पुढे म्हणाले. डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेसने महाराष्ट्राबाबत सविस्तर पुरावे सादर केले होते आणि आपण स्वतः पंतप्रधानांना असहमती पत्र दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. आम्ही आता गप्प बसणार नाही, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, ज्यांनी मतचोरी केली आहे त्यांना कायदा सोडणार नाही आणि प्रत्येकाला उत्तर द्यावेच लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी शेवटी दिला.
दुसरीकडे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 'विशेष निबंध सुधारणा' (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगात अंतर्गत वाद उफाळल्याचे समोर आले असून, इतर दोन आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनीच ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतल्याची माहिती पुढे आली आहे. सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी काम करून निष्पक्षतेचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने इतर विरोधी पक्षांशी याबाबत चर्चा केली असून, संसदेच्या दोन्ही सभागृहांत येत्या दोन आठवड्यांत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस सादर करण्याची तयारी सुरू केल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.