दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही, पंचनाम्यानंतरच निर्णय; बावनकुळेंची स्पष्टोक्ती
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळमध्ये स्पष्ट केलं की, दुष्काळी मदत तातडीने जाहीर होणार नाही, त्यासाठी पंचनाम्यांचा संपूर्ण अहवाल यायलाच हवा.
राज्य सरकारने राज्यात 75 टक्के दुष्काळ जाहीर केला असून, दुष्काळ निवारणासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच बावनकुळे यांनी यवतमाळमध्ये मीडियाशी बोलताना एक महत्त्वाचं विधान केलं आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार नाही, संपूर्ण पंचनामा अहवाल आल्यानंतरच मदत दिली जाईल, असं ते म्हणाले. अन्यथा शेतकऱ्यांचंच नुकसान होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दुष्काळी मदतीतून एकही शेतकरी वगळला जाणार नाही, यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. पंचनामे करताना त्या-त्या भागातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचं सरासरी नुकसान किती आहे, हे पाहूनच मदत दिली जाते, असं त्यांनी नमूद केलं. आजच्याआज मदत जाहीर करता येणार नाही, कारण त्याआधी पिकांचे पंचनामे पूर्ण व्हायला हवेत आणि प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, हे तपासावं लागतं. तूर, कापूस, सोयाबीन, हळद, बागायतदार शेतकरी आणि संत्रा उत्पादकांना नेमकी किती मदत द्यायची, यासाठी वेगवेगळे निकष असल्याचं त्यांनी सांगितलं. कुणीतरी लगेच मदत जाहीर करण्याची मागणी केली होती, मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं, असं उत्तर आपण दिल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. पंचनाम्याच्या आधारेच मदत निश्चित केली जाते आणि मुख्यमंत्री लवकरच याबाबत घोषणा करतील, असंही त्यांनी सांगितलं.
एनडीआरएफच्या मदतीसाठी पंचनामे अचूक होणं गरजेचं असून, तसे झाल्यास शेतकऱ्यांना योग्य मदत मिळते, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळी स्थितीचं नेमकं चित्र मांडणार असून, त्यासाठी दर मंगळवारी उपसमितीची बैठक घेतली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या बैठकांमधून दुष्काळाच्या स्थितीचा नियमित आढावा घेतला जाईल.
दुष्काळावरून विरोधकांनी सुरू केलेलं राजकारण चुकीचं असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. शेतकरी आणि शेतमजुरांवर दुष्काळाचं संकट असून, सगळ्यांनी एकत्र येऊन या झळा समजून घेतल्या पाहिजेत आणि आपापल्या परीने मदत निधीला हातभार लावला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. पंचनामे अचूक व्हावेत यासाठी आपला दौरा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याचे स्पष्ट आदेश महावितरणला दिले असून, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांना सिंचन करता येईल असं ते म्हणाले. वीज न मिळाल्यास त्यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
शरद पवार यांनी दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याच्या मुद्द्यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्ष म्हणून पत्र देणं हे त्यांचं काम आहे, मात्र पवारांनी पत्र दिलं म्हणून सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे, असं नाही, असं ते म्हणाले. अनेक आमदारांनी आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांनीही अशी पत्रं दिली असून, आतापर्यंत 2000 हून अधिक पत्रं आल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले असून, त्यांनी याबाबत निर्णय घेतल्याचं बावनकुळे म्हणाले. दुष्काळाच्या यादीतून वगळलेल्या तालुक्यांचाही अभ्यास केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे बंधूंच्या मोर्चावरही बावनकुळे यांनी भाष्य केलं. निवडणूक आयोगाने याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलं असून, काहींना केवळ राजकारण करायचं आहे, असा आरोप त्यांनी केला. आधी ईव्हीएमवर शंका घेण्यात आली, आता एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, असं ते म्हणाले. विरोधक खोटं बोलत असून बुथवर काम करत नाहीत, बुथलेव्हलला फिरत नाहीत, केवळ शंका घेतात आणि आरोप करतात, अशी टीका त्यांनी केली. निगेटिव्हिटी पसरवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न होत असल्याचं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार केला गेला होता, मात्र आता लोकांना सत्य समजल्यानेच विधानसभा निवडणुकीत भाजपला 51 टक्के मतदान मिळालं आणि काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर गेला, असं बावनकुळे यांनी सांगितलं. या देशात खरेपणाच टिकेल, खोटेपणा चालणार नाही, असंही ते म्हणाले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.