मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:47 IST

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

राज्यातील २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ लागू, धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्रात यंदा पावसाने नीट साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. या सर्व तालुक्यांत सरकारने 'ट्रिगर १' लागू केले आहे. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुके सध्या दुष्काळाचा सामना करत असून, हे प्रमाण राज्याच्या एकूण भागापैकी ७५ टक्के इतके आहे.

धाराशिव जिल्ह्यालाही या दुष्काळाचा फटका बसला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा या सर्व तालुक्यांत खरीप हंगाम २०२६ साठी ट्रिगर-१ लागू झाले आहे.

शासनाने २५ सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार या तालुक्यांत पीक पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीची कामे वाढवणे, टँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाची कामे हाती घेणे अशा विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र पीक नुकसानीसाठीची आर्थिक मदत यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढला जाणार आहे.

जमीन महसुलात माफी देण्यासोबतच पीक कर्जाची पुनर्रचना केली जाणार आहे आणि कृषी कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती दिली जाणार आहे. ७.५ एचपी क्षमतेच्या कृषी पंपांची वीज बिले याआधीच माफ करण्यात आली होती, आता त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठीही ही माफी लागू केली जाणार आहे. शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट दिली जाईल. गरज असलेल्या भागांत पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जातील आणि पाणीटंचाई जाहीर झालेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही.

शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना धान्य पुरवले जाणार आहे, तर जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्थाही केली जाईल. मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार असून पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठीच्या पाणीपुरवठा योजना आधीच्या आदेशानुसार सुरू राहतील. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे तसेच पिकांची स्थिती दाखवणारे फोटो आणि जीपीएस डेटा गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवस दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या हिताचा व गरजांचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर दुष्काळासंबंधी आदेश काढून त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत आपले आश्वासन पूर्ण केले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ