मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:46 IST

बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरीत प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळग्रस्तांना मदत द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागाला निर्देश दिले.

बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरीत प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळग्रस्तांना मदत द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मुंबई : बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळले गेले होते. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभाग यांना प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पाऊस अनिश्चित आणि असमान पडला. पिकांची अवस्था चिंताजनक आहे, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण वाढतो आहे, हे लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यानंतर उरलेल्या या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळावा, म्हणून त्यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आ. मुनगंटीवार यांनी तिन्ही तालुक्यांतील पाऊस, पिकांची सध्याची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची मागणी केली. फक्त पूर्वी ठरलेले निकष किंवा उपलब्ध आकडेवारी पाहून निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी त्यांची भूमिका होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्राऊंड ट्रुथिंगमधून प्रत्यक्ष परिस्थिती तपासणे, नव्या पीक पाहणी पद्धतीतून पिकांची स्थिती समजून घेणे आणि आवश्यक ते पंचनामे करून वस्तुस्थिती निश्चित करणे, यावर त्यांनी भर दिला. दुष्काळाची प्रत्यक्ष झळ बसलेल्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभाग यांना देण्यात आले आहेत.

यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा मार्ग, प्रत्यक्ष परिस्थितीची नव्याने पडताळणी करण्यासाठी खुला झाला आहे. पाहणी आणि पंचनाम्यांतून दुष्काळाची तीव्रता आणि पिकांचे नुकसान स्पष्ट झाल्यावर त्याआधारे पुढचे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला, तर संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. यात वीज बिलात सवलत, वीजजोडणी खंडित न करणे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलत, पाणीपुरवठा तसेच पिकाच्या नुकसानीनुसार मदत आणि नुकसानभरपाई यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनाम्यांच्या आधारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत दिलासा मिळावा, यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

"शेतकऱ्याच्या शेतात संकट किती आहे, हे कागदावरच्या आकडेवारीपेक्षा त्याच्या बांधावर जाऊनच समजू शकते. त्यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांना फक्त यादीतून वगळले गेले म्हणून दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये. ग्राऊंड ट्रुथिंग, पीक पाहणी आणि पंचनाम्यांतून प्रत्यक्ष परिस्थिती समोर यावी आणि दुष्काळाची झळ बसलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मदत मिळावी, हीच आपली भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्देश दिल्याबद्दल त्यांचे आभार," असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बळीराजाच्या संकटात त्याच्या पाठीशी उभे राहणे, त्याचा आवाज शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचवणे आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे त्याला न्याय मिळवून देणे, या भूमिकेतून आ. मुनगंटीवार यांनी हा पाठपुरावा केला. त्यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांच्या आशेला आता नवी दिशा मिळाली आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ