ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या; हल्ल्याआधी रेकी झाल्याचा कुटुंबाचा दावा
शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप ऊर्फ बाला पूर्णेकर यांच्या हत्येमागे अनेक दिवसांपासून रचलेला कट असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ठाण्यातील मनोरमा नगर येथे शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप ऊर्फ 'बाला' पूर्णेकर यांची हत्या झाली असून, त्यामुळे शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या कार्यालयात बसलेले असताना पाच जणांच्या टोळक्याने आत घुसून त्यांच्यावर 7 राऊंड फायर केले, त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतला. हा अचानक झालेला हल्ला नसून अनेक दिवसांपासून शिजत असलेला कट होता, असा दावा पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे.
प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी गणेशोत्सवाच्या काळातच मनोरमा नगर परिसरात येऊन सगळ्या भागाची बारकाईने रेकी केली होती. ते रोज तिथे येऊन बसायचे आणि योग्य संधीची वाट बघायचे.
मंगळवारी रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी परिसरातले सगळे कार्यकर्ते नवरात्रौत्सवाची वर्गणी गोळा करायला बाहेर गेले होते. नेमकी तीच वेळ साधून हल्लेखोर कार्यालयात शिरले, असे जयनाथ पूर्णेकर यांनी सांगितले. त्यावेळी प्रदीप पूर्णेकर कार्यालयात एकटेच होते. पिस्तुलातून झाडलेल्या 7 गोळ्यांपैकी 2 गोळ्या त्यांच्या वर्मी लागल्या. ते वाचू नयेत म्हणून आरोपींनी कोयत्यानेही वार केले, असे कुटुंबीय सांगतात.
राम पूर्णेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी नीलकंठ इमारतीत संशयित व्यक्ती आणि एका बड्या नेत्याची बैठक झाली होती. गणपती विसर्जन मिरवणुकीत त्यांनी या सगळ्यांना एकत्र उभे असलेले स्वतः पाहिले. त्यांना बघून ते लोक दचकले आणि त्यातल्या एकाने 'तू प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा आहेस का?' असे विचारले, असेही राम यांनी सांगितले.
या हालचाली दिसल्यावर राम यांनी वडिलांना लगेच सावध केले. तेव्हा प्रदीप पूर्णेकर म्हणाले होते, "रात्री 10 वाजेनंतर तू अजिबात घराबाहेर पडू नकोस. मला मारण्यासाठी आलेली गोळी तुलाही लागू शकते." यावरून आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची त्यांना आधीच कुणकुण लागली होती, हे स्पष्ट होते.
कुटुंबीयांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर थेट आरोप केला आहे. हेच या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. राम पूर्णेकर यांच्या दाव्यानुसार, महापालिका निवडणुकीच्या काळात मीनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी 'निवडणुका संपल्यानंतर बाळाला (प्रदीप पूर्णेकर) संपवेन' अशी उघड धमकी दिली होती. नीलकंठ इमारतीत राजेंद्र शिंदे आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारे मारेकरी यांच्या गुप्त बैठका झाल्याचा आरोप जयनाथ पूर्णेकर यांनी केला आहे. मानपाडा आणि मनोरमा नगर भागातील क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा आणि राजकीय वर्चस्वाची लढाई यातून ही हत्या घडवून आणली गेली, असे कुटुंबीय म्हणतात.
पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या 'पप्या शिंदे' याच्याबद्दलही कुटुंबाला तीव्र संशय आहे. तो प्रदीप पूर्णेकर यांचा जुना मित्र होता आणि हत्येच्या दोन दिवस आधी कार्यालयात येऊन तास-दीड तास गप्पा मारत बसला होता. गोळीबार झाला तेव्हाही तो तिथेच होता, असा कुटुंबीयांचा दावा आहे. "पप्या आम्हाला सांगत होता की गोळी लागल्यावर त्याने वडिलांना पकडले. पण संपूर्ण घटनेत त्याच्यावर एकही वार झाला नाही, त्याला साधी दुखापतही झाली नाही, हे कसे शक्य आहे?" असा सवाल राम पूर्णेकर यांनी केला. रुग्णालयात येऊन तो इतर संशयितांना शिव्या देत असल्याचे नाटक करत होता, असेही ते म्हणाले.
जयनाथ पूर्णेकर यांच्या सांगण्यानुसार, प्रदीप पूर्णेकर परिसरात अमली पदार्थ (ड्रग्ज) विकणाऱ्या माफियांविरोधात कडक मोहीम चालवत होते. तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी ते अनेकदा रात्री एकटेच कारवाईला जायचे आणि त्यामुळे त्यांना धमकीचे फोनही आले होते. "ड्रग्ज विक्रेत्यांचा वापर करून हे राजकीय विरोधक काहीही करू शकतात, त्यामुळे एकटा जाऊ नकोस," असे जयनाथ यांनी भावाला बजावले होते.
या घटनेचे पडसाद मनोरमा नगर आणि मानपाडा परिसरात उमटले. बुधवारी मनोरमा नगर परिसरातील सगळी दुकाने आणि 3 शाळा कडकडीत बंद होत्या. या भागात पूर्णेकर कुटुंबाला मोठा जनाधार आहे. महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी आणि भावाचा पराभव झाला असला, तरी त्यांना भरपूर मते मिळाली होती.
रक्तबंबाळ झालेल्या पूर्णेकर यांना घटनास्थळावरून रुग्णालयात नेतानाचे CCTV फुटेजही समोर आले आहे. त्यांचा मृतदेह सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवला आहे. मुख्य सूत्रधार आणि सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कडक न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 9 विशेष पथके रवाना केली आहेत.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.