ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांचा गोळ्या झाडून खून; पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात
मानपाडा परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाली. कुटुंबीयांनी कटाचा संशय व्यक्त केला असून सर्व आरोपी अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील मानपाडा परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची सोमवारी (२९ सप्टेंबर) हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. मानपाडा येथील त्यांच्या कार्यालयाबाहेरच हा हल्ला झाला.
हल्ल्यानंतर पूर्णेकर यांना कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पूर्णेकर यांचा खून जुन्या वादातून झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी हत्येचा कट रचल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. पोलिस या आरोपांची चौकशी करत आहेत. नेमके कारण काय आणि यामागे कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात चेहऱ्यावर रुमाल बांधलेले दोघे जण दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत असल्याचे समोर आले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.
पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी नीलकंठ परिसरात राजेंद्र शिंदे आणि आता संशयित म्हणून ताब्यात घेतलेले लोक एकत्र उभे असल्याचे आपण पाहिले, असा दावा त्यांनी केला. आपण तेथून जात असताना ते दचकले, असे राम यांनी सांगितले. त्यानंतर एकाने आपल्याकडे येऊन 'तू प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा आहेस का?' असे विचारले, असेही ते म्हणाले. त्यामुळे काहीतरी कट शिजत असल्याचा संशय आला आणि तसे वडिलांना आधीच सांगितले होते, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रदीप पूर्णेकर यांनी त्यांना रात्री दहानंतर घराबाहेर पडू नकोस, असा सल्ला दिला होता.
राम पूर्णेकर यांनी सांगितले की, मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये वडिलांचे नाव घेऊन धमकी दिली गेली, असा त्यांचा दावा आहे, आणि म्हणून त्यांचा संशय मीनाक्षी शिंदे यांच्यावर आहे. पप्या शिंदे हा वडिलांचा जुना मित्र असून घटनेच्या दोन दिवस आधी तो कार्यालयात येऊन बराच वेळ बोलला होता, असेही राम यांनी सांगितले. हल्ल्याच्या वेळी कार्यालयात फारसे लोक नव्हते, असे ते म्हणाले.
पप्या शिंदे आपल्याला गोळी लागली आणि आपण हल्लेखोरांना पकडले, असे सांगत होता, असे राम यांनी सांगितले. मात्र त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, असा दावा करत त्यांनी त्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला. पप्या शिंदे रुग्णालयातही आला होता आणि तेथे एकाला शिवीगाळ करत होता, त्यानंतर पोलिसांनी त्यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतले, असे त्यांनी नमूद केले.
पूर्णेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे. जे. रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये बसून राहू आणि सर्व आरोपी अटक झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ, असे राम पूर्णेकर यांनी सांगितले.
'माझ्या वडिलांनी आयुष्यभर न्यायासाठी काम केले. त्यामुळे त्यांना न्याय मिळायला हवा,' अशी मागणी राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्ल्यामागचे कारण शोधत आहेत.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.