मुदत संपूनही पैसे मिळेनात; निर्मल उज्ज्वल पतसंस्थेच्या नंदनवन कार्यालयाबाहेर ठेवीदारांची गर्दी
मुदत संपूनही ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याने नागपुरातील निर्मल उज्ज्वल पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी गर्दी करून गोंधळ घातला.
नागपुरातील 'निर्मल उज्ज्वल' पत संस्थेच्या (Nirmal Ujjwal Credit Cooperative Society) ठेवीदारांचा संताप काल (5 ऑक्टोबर) रस्त्यावर आला. खात्यातील पैसे आणि ठेवी परत मिळाव्यात म्हणून ठेवीदार नंदनवन परिसरातील संस्थेच्या मुख्य कार्यालयात पोहोचले आणि तिथे त्यांनी गोंधळ घातला. ठेवींची मुदत संपूनही रक्कम मिळत नसल्याने हे ठेवीदार संतप्त झाले होते.
नंदनवन येथील मुख्य कार्यालयाबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी उसळली होती. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून पोलिसांनी तिथे बंदोबस्त लावला होता. संस्थापक सचिव प्रमोद मानमोडे यांच्या दालनाबाहेरही पोलीस तैनात करण्यात आले होते. कार्यालयासमोरचा पोलीस बंदोबस्त पाहून पतसंस्थेवर आयकर विभागाची धाड पडल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे गर्दी आणखी वाढली.
मुदतपूर्तीनंतरही ठेवींची रक्कम मिळत नसल्याने गेले काही दिवस ठेवीदारांमध्ये संस्थेच्या कारभाराबद्दल मोठा असंतोष आहे. चेक बाऊन्स होण्याच्या घटनांमुळेही ठेवीदारांची चिंता वाढली आहे. 'सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीज'कडून संस्था अवसायनात काढण्याची नोटीस बजावल्याची माहिती पसरल्याने खातेदार आणि ठेवीदार आणखी चिंतेत आहेत.
संस्थेच्या विदर्भातील 50 हून अधिक शाखांमध्ये सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या ठेवी अडकल्या आहेत. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी संस्थापकांनी 45 ते 60 दिवसांचा अवधी मागितला होता. हा कालावधी उलटूनही अनेक ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही, त्यामुळे रोष वाढला आहे. आपली रक्कम नेमकी कधी मिळणार आणि त्याबाबत निर्मल उज्ज्वल पत संस्था कोणते पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यवतमाळमध्येही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. यवतमाळच्या जनसंघर्ष सहकारी बँक, अष्टविनायक पतसंस्था, महिला नागरी पतसंस्था आणि महिला बाबाजी दाते बँकेतील ठेवीदारांच्या रकमेच्या अनियमिततेचे प्रकरण ताजे असतानाच, आता रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांना रक्कम मिळत नसल्याचे प्रकरण पुढे आले आहे. मागील काही दिवसांपासून विड्रॉल मिळणे बंद झाल्याने ठेवीदारांनी मुख्य शाखेत एकच गर्दी केली. या संस्थेच्या घाटंजी आणि वणी येथे शाखा असून 35 कोटींच्या ठेवी आहेत. आर्थिक व्यवहार सुरळीत नसल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
एफडी, दैनिक बचत ठेव आणि इतर माध्यमांतून ठेवीदारांनी तब्बल 35 कोटी रुपये या सोसायटीत गुंतवल्याचे समोर येत आहे. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी 31 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले होते. संस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी आणि व्याज परत करत नसल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. निवेदनाची प्रत मुख्य कार्यालयातही लावण्यात आली. त्यानंतर यवतमाळ आणि घाटंजी येथील ठेवीदारांनी मुख्य शाखेत गर्दी करून विड्रॉल देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जबाबदार अधिकारी तिथे नसल्याने ठेवीदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले.
पदाधिकाऱ्यांनी आमचे पैसे घेऊन पलायन केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी ठेवीदारांनी सुरू केली आहे.