मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:47 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत दुष्काळाचा 'ट्रिगर-१' लागू, शेतकऱ्यांना दिलासा

पावसाची तूट आणि इतर निकषांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत 'ट्रिगर-१' लागू करण्यात आला असून पीक कर्ज पुनर्गठन, वीजबिल सवलत आणि रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत दुष्काळाचा 'ट्रिगर-१' लागू, शेतकऱ्यांना दिलासा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसात झालेली तूट आणि इतर घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'ट्रिगर-१' लागू करण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांचा समावेश आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाचा फटका बसू नये, यासाठी शासनाने विविध उपाययोजना आणि सवलती जाहीर केल्या आहेत. दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ नुसार ठरलेल्या पद्धतीनुसार, जूनपासून आतापर्यंतच्या पावसाची तूट आणि इतर निकष विचारात घेऊन ही परिस्थिती निश्चित करण्यात आली.

कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये 'ट्रिगर-१' लागू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभूर्णा या सर्व १२ तालुक्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख ७० हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यातील मुख्य पीक असलेल्या कापसाची लागवड १ लाख ९३ हजार ९४४ हेक्टरवर, धानाची १ लाख ८६ हजार ४२ हेक्टरवर तर सोयाबीनची ५३ हजार ९७६ हेक्टरवर झाली होती.

सर्वाधिक नुकसान धान पिकाचे झाले असल्याचे समोर आले आहे. दुष्काळग्रस्त भागांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती यासह अनेक सवलती लागू करण्यात आल्या आहेत. कृषिपंपांच्या चालू वीजबिलातही सूट मिळणार आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीजबिल आधीच माफ करण्यात आले असल्याने, त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांना ही सवलत लागू राहील. शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीमध्येही माफी दिली जाणार आहे. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामे सुरू करण्यासाठी निकष शिथिल केले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची गरज भासल्यास टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.

दुष्काळाचा परिणाम शेतकरी आणि शेतमजुरांच्या उपजीविकेवर होऊ नये यासाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. जनावरांसाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी लागणारे पाणी याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच जलसंधारणाची कामेही हाती घेतली जाणार आहेत.

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले की, 'ट्रिगर-१' लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांच्या पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दाखवणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट गोळा करून पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ