वाशिममध्ये मनसेचा मोर्चा, दुष्काळ जाहीर न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यात पावसाने खंड दिल्याने खरीप पिके संकटात, मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला.
वाशिम जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने मोठी उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके अडचणीत सापडली असून सोयाबीन, तूर, कापूस अशा विविध पिकांवर याचा वाईट परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांसह आक्रोश मोर्चा काढला. सरकारने आठ दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही, तर शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही मनसेने दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक घेऊन घोषणा देत शेतकरी आणि मनसेचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, देशमुख हॉस्पिटल, सिव्हिल लाईन आणि शासकीय विश्रामगृह असा मार्ग पार करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यात पाऊस बराच काळ गायब राहिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली असून काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, महागडी खते-बियाणे, मजुरी आणि मशागतीचा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असताना पावसाच्या खंडामुळे संकट आणखी गडद झाल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकारने केवळ पाहणी किंवा आश्वासने देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मदत द्यावी, जिल्ह्यातील पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पीकविम्याची भरपाई मिळवून द्यावी आणि कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गर्दी झाली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
मोर्चादरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आठ दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या मोर्चात कारंजा-मानोरा जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, रिसोड मालेगाव उपजिल्हाध्यक्ष अतीश डहाळ, वाशिम-मंगरुळपीर उपजिल्हाध्यक्ष उमेश टोलमारे, कृषी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ राठोड, वाशिम तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष लक्ष्मण जाधव, रिसोड तालुकाध्यक्ष योगेश, मानोरा तालुकाध्यक्ष संतोष घोडे, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, कारंजा शहराध्यक्ष कपिल महाजन, मालेगाव कृषी सेना तालुकाध्यक्ष रवी पवार, वाशिम शहर उपाध्यक्ष गजानन इंगोले आणि उपशहराध्यक्ष आकाश लोलप यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.