कृषिमंत्री भरणे यांची शेतात जाऊन सोयाबीन नुकसानीची पाहणी, मदतीचे आश्वासन
संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची बांधावर जाऊन पाहणी केली आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले.
शेतकऱ्यांना पीक विमा आणि कर्जमुक्ती योजनांचा लाभ प्राधान्याने मिळावा यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावातील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेतात जाऊन कृषिमंत्री भरणे यांनी दुष्काळसदृश स्थितीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांना पीक विमा घेताना अडचणी येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच, कृषी आणि महसूल विभागाने चालू खरीप हंगामातच तातडीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
दुष्काळाच्या अशा अवघड काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे कृषिमंत्री म्हणाले. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊनच शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शेती, पशुपालन, चारा आणि पाणीटंचाई या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या. केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठीची सविस्तर अधिसूचना लवकरच शासनाकडून जाहीर केली जाणार आहे. यात सर्व प्रकारच्या मदतीचा समावेश असेल आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सोयाबीन पिकाची पाहणी करताना पावसाअभावी हे पीक पूर्णपणे वाया गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. मी स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांची परिस्थिती मी अनुभवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि शासनामार्फत मिळणाऱ्या सर्व मदतीसाठी खंबीरपणे उभा राहीन, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्यात अडचण येऊ नये यासाठी महावितरणच्या संबंधित विभागाने डीपी आणि ट्रान्सफॉर्मर वेळेत उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही त्यांनी महावितरण विभागाला दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मुगाची ४७.८३% आणि उडदाची ६१.४५% पेरणी झाली आहे, तर कपाशीची ९१.६६% पेरणी होऊन पिके पाती, फुलोरा आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसाअभावी वाढ खुंटून पाती आणि फुले गळत आहेत, तसेच काही ठिकाणी रस शोषक कीड आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनची ११३.०३% पेरणी झाली असून पीक सध्या शेंगा भरण्याच्या संवेदनशील टप्प्यात आहे. पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपट्या राहून दाणे बारीक राहण्याची आणि हलक्या जमिनीवरील पिके सुकण्याची शक्यता आहे.
मका पिकाची १६३.३४% पेरणी झाली असून पिके कणसे भरण्याच्या अवस्थेत आहेत, मात्र अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटल्याने वजनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तुरीची १३४.३२% पेरणी झाली असून पाण्याच्या ताणामुळे वाढ खुंटली आहे. खरीप बाजरीची ६३.८३% पेरणी झाली असून पावसाच्या खंडामुळे वाढ खुंटून पीक सुकले आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणी आणि पिकांच्या स्थितीबाबतचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सादर केला.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.