वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा
वाशिम जिल्ह्यात ४५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके करपली, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
वाशिम जिल्ह्यात गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. जिल्ह्यात यंदा पावसाने इतका मोठा खंड दिला की शेतकऱ्यांच्या हातातून संपूर्ण खरीप हंगाम गेला. यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटकाळात शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने सोमवारी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षाचे आमदार व उपनेते नितीन बापू देशमुख, वाशिम जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, डॉ. सुधीर कव्हर, डॉ. सिद्धार्थ देवळे, गजानन देशमुख आणि प्रशांत सुर्वे यांनी केले. मोर्चानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शिवसेनेने वाशिम जिल्ह्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या परिस्थितीचे तत्काळ पंचनामे करून जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय मागील वर्षीच्या पीकविमा योजनेतील चार ट्रिगर पूर्ववत करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार विमा भरपाई द्यावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.
या मोर्चात आमदार नितीन बापू देशमुख, वाशिम जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, जिल्हासह संपर्क प्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ देवळे, जिल्हा संघटक गजानन देशमुख आणि लोकसभा संघटक प्रशांत सुर्वे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शासनाने या मागण्यांवर तातडीने व गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शेतकरी जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीवर बसून या मोर्चाचे नेतृत्व केले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.