'शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?'; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली आणि सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाचा हा मोठा खंड राज्यभर जाणवत असून बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पिकांची अवस्था अतिशय वाईट झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. केवळ आकडेवारी किंवा अहवालांवर विसंबून न राहता त्यांनी स्वतः बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती बघितली आणि त्यानंतर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या 40 ते 45 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिकं करपून गेल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. इतके दिवस पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची वेळ आल्याचं चित्र आहे. असं असतानाही शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र बैठका आणि चर्चांमध्येच वेळ घालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. "शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने तब्बल 20 एकर सोयाबीन पीक मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरचं पीक हातचं जाणार असल्याने त्या शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपल्या शेताची अवस्था प्रत्यक्ष येऊन बघावी, अशी आर्जव विनंती केली होती. मात्र कोणीही त्याच्याकडे फिरकलं नाही, असा दावा सपकाळ यांनी केला. कृषिमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाही त्या शेतकऱ्याची भेट घेतली नसल्याचं सांगत सपकाळांनी सरकारला धारेवर धरलं. "शेतकरी सरकारकडे मायबाप म्हणून आशेने बघतो, पण सरकारला त्यांची काहीच पर्वा नाही," अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सपकाळांनी काही ठोस मागण्या मांडल्या. हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत. या तिन्ही मागण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक आणि सामाजिक दिलासा मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्याग्रह आणि गावोगावी आंदोलन सुरू असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. गावागावांत जाऊन पक्षाकडून हा प्रश्न लावून धरला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
याचवेळी शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, असं आवाहनही सपकाळ यांनी केलं. "आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका," असं सांगत संकटाच्या काळात धीर धरण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. आता सपकाळांच्या या मागण्यांवर राज्य सरकार काय निर्णय घेतं, याकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.