संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात राडा, आक्रमक शेतकऱ्यांकडून खुर्च्यांची तोडफोड
बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, पण प्रांताधिकारी गैरहजर असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट केबिनमध्ये घुसून खुर्च्यांची तोडफोड केली.
संगमनेरमध्ये आज राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा खास आयोजित करण्यात आला होता आणि मोठ्या संख्येने शेतकरी यात सहभागी झाले होते.
पण एवढा मोठा मोर्चा दारात येऊन धडकला असतानाही प्रांताधिकारी अरुण उंडे कार्यालयात हजर नव्हते. जबाबदार अधिकारीच गैरहजर असल्याचे पाहून आंदोलकांचा पारा चढला. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. आपल्या नेत्यांना असे दारातच रस्त्यावर बसावे लागलेले पाहून मोर्च्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले.
नेत्यांना दारात बसावे लागल्याचे पाहून संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. आत घुसलेल्या शेतकऱ्यांनी केबिनमधील खुर्च्या उचलून बाहेर फेकल्या आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
"शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोर्चा आला असताना प्रांताधिकारी गैरहजर राहतात, ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची परिसीमा आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना वाढत चालली आहे. विशेष म्हणजे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ वीज उपलब्ध नसल्याने पिकांना पाणी देता येत नाहीये. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
याच समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. पण मोर्चा असतानाही प्रांताधिकारी कार्यालयात हजर नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. त्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयात घुसून खुर्च्यांची तोडफोड केली आणि प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. या संपूर्ण घटनाक्रमामुळे प्रांताधिकारी कार्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.