खामगावात कृषिमंत्री भरणे यांची शेतकऱ्यांशी बांधावर चर्चा, दुष्काळाचा आढावा
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी खामगाव तालुक्यातील पिंप्राळा गावात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांवर काय परिणाम झाला, हे त्यांनी शेतकऱ्यांकडून समजून घेतले. शेतकऱ्यांशी थेट बोलून त्यांच्या अडचणी आणि शेतीची सध्याची परिस्थिती जाणून घेतली.
राज्यातील सगळ्या तालुक्यांत पाऊस, पाणी आणि पिकांची स्थिती प्रत्यक्ष जाऊन तपासावी आणि लगेच अहवाल द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासनाचे लोक शेतशिवारात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पिकांची स्थिती कशी आहे, पाणी किती उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांसमोर कोणत्या अडचणी आहेत, हे प्रत्यक्ष पाहणीतून समजून घेण्यावर भर दिला जातोय. पिंप्राळ्यात पाहणीच्या वेळी शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती, पिकांना लागणारे पाणी आणि शेतीतल्या वेगवेगळ्या अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.
प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं कृषिमंत्री भरणे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती बघितल्यामुळे स्थानिक अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचायला मदत होणार आहे, असं ते म्हणाले. या पाहणीच्या आधारे संबंधित भागाचा अहवाल तयार करून पुढची कारवाई केली जाणार आहे. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, तसंच कृषी विभाग आणि प्रशासनाचे अधिकारी हजर होते.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री भरणे यांचा ताफा अडवून निवेदन दिलं. जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. भरणे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. पावसाअभावी खरीप हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं.
खामगाव, जळगाव, शेगाव, मलकापूर अशा बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची वस्तुनिष्ठ पाहणी करून दुष्काळसदृश परिस्थितीची नोंद घ्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पिकांचे पंचनामे तातडीने करून नुकसानभरपाई द्यावी, तसंच पीकविमा, कर्ज आणि इतर सरकारी योजनांमधून आवश्यक मदत मिळवून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, या मागणीसाठी सत्याग्रह शेतकरी संघटनेने रविवारी पारखेड फाटा इथे कृषिमंत्री भरणे यांचा ताफा अडवला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन देत नुकसानभरपाईची मागणी केली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.
सत्याग्रह शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू नाकाडे यांनी कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या मांडल्या. जिल्ह्यात कोरडा किंवा ओला दुष्काळ पडल्यावरही बुलढाणा जिल्ह्याला अनेकदा मदतीतून वगळलं जातं, असा आरोप त्यांनी केला. यापुढे तुटपुंजी मदत स्वीकारली जाणार नाही आणि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली नाही तर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा नाकाडे यांनी दिला. या वेळी जिल्हाध्यक्ष समाधान भातुरकर, प्रदीप देशमुख, गणेश गावंडे, मनोज पाटील, विष्णू टाले, रामेश्वर डोबे, संजय फाटे, पुंडलिक यादगिरे, गौरव हेलगे, अर्जुन खानंदे, महेश हेलगे, गजानन यादगिरे, पांडुरंग पुराने, अनिल गवांदे, गणेश राखुंडे, विठ्ठल शिंदे, नारायण यादगिरे, गणेश भेलके, नंदकिशोर लाहूळकर आणि पवन टापरे उपस्थित होते.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.