बीडमध्ये रोहित पवार यांचा सुनेत्रा पवार यांना दुष्काळी दौऱ्याबाबत टोला
जनआक्रोश मोर्चादरम्यान आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान त्यांनी बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला. सुनेत्रा पवार यांनी दुष्काळी परिस्थितीत प्रत्यक्ष दौरे करावेत, केवळ कागदी दौरे करण्याऐवजी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, असा रोखठोक सल्ला रोहित पवार यांनी दिला.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 रुपये मदत द्यावी. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री असल्याने त्यांनी दौरा केलाच पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांचे मंत्री भरणे मामा दौरा करत असून शेतकरी त्यांना प्रश्न विचारतात, तेव्हा आपल्याला कोणतेही अधिकार नसल्याचे ते सांगतात, असेही रोहित पवार यांनी नमूद केले. यावर टोला लगावताना रोहित पवार म्हणाले की, अधिकार नसतील तर मंत्री करून काय उपयोग झाला, स्वाभिमानी असाल तर सरकारची साथ सोडा आणि रस्त्यावर या. तसेच लोकांच्या बाजूने लढा आणि सरकारला गुडघ्यावर आणून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
दुसरीकडे, राज्याच्या उपमुख्यमंत्री व बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी देखील दुष्काळी परिस्थितीत दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले. मुख्यमंत्री दौरा करत असले तरी बॅरिकेट लावतात, मेटल डिटेक्टर लावतात, असं दौऱ्याचं नाटक करून चालणार नाही, त्यापेक्षा घरी जावा, एसीमध्ये बसा, ऑफिसमध्ये बसा, असा टोला रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 रुपये आणि मजुरांना 25000 रुपये मदत द्यावी, ही आमची मागणी असून ती मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. डोमेगाव आणि दूनगाव परिसरातील शेतांमध्ये जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करताना, पावसाअभावी खरीप पिकांवर झालेला परिणाम, पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती त्यांनी घेतली. अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याची भूमिका रोहित पवार यांनी यावेळी मांडली.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.