भाजपला नेस्तनाबूत करू, मोदी, शाह, भागवत यांनी लोकशाही संपवली, असा राहुल गांधी यांचा आरोप
दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्चात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे खासदार आज रस्त्यावर उतरले. इंडिया आघाडी या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेससह इंडिया आघाडी आणि इतर घटक पक्षांचे जवळपास ३०० हून अधिक खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.
पण या मोर्चादरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठी झटापट झाल्याचेही पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान विरोधी पक्षांच्या खासदारांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी केलेल्या या आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "आम्ही केवळ भाजपशी संघर्ष करणार नाही, तर त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करू. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकशाही संपवली आहे." पुढे ते म्हणाले की, आपल्या देशासोबत जे केले गेले आहे त्याला देशद्रोह म्हणतात आणि त्यातून कोणीही सुटू शकणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
आजच्या आंदोलनात सुमारे ३०० विरोधी खासदार सहभागी झाले होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच, "आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडण्यापासून रोखले जात आहे," असेही ते म्हणाले.
मंगळवारी निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनी अचानक आकाशवाणी भवनच्या आवारात प्रवेश केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, "आज सकाळी इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खासदारांना बळजबरीने थांबवले. सध्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वद्रा यांच्यासह इतर अनेक नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ऑल इंडिया रेडिओच्या आवारात आंदोलनावर बसले आहेत."
या सगळ्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाजवळची परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी तैनात आहेत. एनएसयूआयचे अनेक कार्यकर्ते आकाशवाणी भवनमध्ये पोहोचले होते आणि त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.