सीजेपीच्या तीन नेत्यांना न्यायालयीन कोठडी; अभिजीत दिपके यांचा पंतप्रधान मोदींना सवाल
आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आणीबाणी अधिकृतपणे जाहीर करण्याचे आव्हान नरेंद्र मोदींना दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि त्यांचे सहकारी अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तिथे त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यांची तुरुंगात रवानगी झाली. या अटकेवरून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, काल सौरव, आशुतोष आणि अजिंक्य शिंदे यांना जबरदस्तीने डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना त्यांच्या वकिलांशी किंवा कुटुंबीयांशी बोलूही दिले गेले नाही. आज सकाळी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातच विशेष दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून तिघांनाही पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. केवळ जंतरमंतरवर राष्ट्रध्वज फडकवला, एवढ्यावरून तो गुन्हा ठरवून दडपशाही सुरू आहे, असा आरोप पक्षाने केला आहे.
या अटकेवर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, देशात आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करावी, असे मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो. सीजेपीच्या नेत्यांनी फक्त जंतरमंतरवर तिरंगा फडकवला म्हणून तुम्ही भित्र्यासारखे त्यांना पाच दिवस तुरुंगात टाकत आहात, असे त्यांनी म्हटले. असे तर आणीबाणीच्या काळातही झाले नव्हते, तिरंगा फडकावणे हे कधीपासून पाप मानले जात आहे, असा त्यांचा सवाल आहे. असे भित्र्यासारखे वागू नका, तुमच्यात दम असेल तर आणीबाणीची अधिकृत घोषणा करा, असे आव्हान दिपके यांनी दिले आहे.
सीजेपीवर गंभीर आरोप केले जात आहेत, असे विचारले असता दिपके यांनी उत्तर दिले की, नुसते आरोप कशाला करता, पुरावे दाखवा. तुमची सत्ता आहे, चौकशी करा आणि सिद्ध करा. हे सर्व लोक भित्रे आहेत आणि पोलिसांच्या मागे लपत आहेत, असे त्यांनी म्हटले. मोदींच्या राज्यात जंतरमंतरवर तिरंगा फडकावणे हे पाप आहे का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी हे सर्व करत आहेत, असा दिपके यांचा आरोप आहे. नरेंद्र मोदी सत्तेत राहावेत म्हणून ज्ञानेश कुमार निवडणूक प्रक्रियेत फेरफार करत आहेत, असेही त्यांनी म्हटले. याविरोधात आम्ही लढत आहोत, असे ते म्हणाले.
मात्र याचा अर्थ इंडिया आघाडीला आमचा विरोध आहे असा नाही, असे दिपके यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीचे आंदोलन आणि सीजेपीचे आंदोलन एकाच मागणीसाठी आहे, असेही अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.