जंतर-मंतरवर आंदोलनाला बंदी; रामलीला, बुराडी आणि सीबीडी मैदानावरच परवानगी
दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी नवी मार्गदर्शक सूचना जाहीर केली असून जंतर-मंतरवर आता कोणालाही आंदोलन करता येणार नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिल्लीत आंदोलन करायचे असेल तर यापुढे जंतर-मंतर हा पर्याय राहणार नाही. गृहमंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला असून आता जंतर-मंतरवर कोणालाच आंदोलन करण्याची परवानगी नसेल. दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी नवी मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. हा निर्णय गृहमंत्रालयाच्या समितीच्या शिफारशीच्या आधारे घेण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने नागरिकांना आंदोलन करण्यासाठी सध्याच्या 'निश्चित जागे'शिवाय इतर योग्य ठिकाणांचा शोध घेण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीच्या शिफारशीनुसार जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही.
आता रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान (पूर्व दिल्ली) या तीन ठिकाणीच विरोधक किंवा सामान्य नागरिक आंदोलन करू शकतील. या तीन जागांवर आंदोलन करण्यासाठीची सविस्तर आणि सुधारित एसओपी (प्रमाणित कार्यपद्धती) नंतर प्रसिद्ध केली जाईल. दिल्ली पोलिसांचे हे आदेश 28 एप्रिल 2022 च्या जुन्या स्टँडिंग ऑर्डरमध्ये केलेला अंशकालीन बदल आहेत.
दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या जंतर-मंतरला विरोधक आणि आंदोलकांनी नेहमीच पसंती दिली आहे. नुकतेच कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने अनेक पावले उचलली. सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर पोहोचण्याआधीच ताब्यात घेतले होते.
या आंदोलनासाठी दिल्ली सरकारला जवळपास 45 मेट्रो स्टेशन बंद करावी लागली होती. त्याचबरोबर अनेक ट्रेनही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेलाही त्रास सहन करावा लागला होता. जंतर-मंतरवर वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता हे ठिकाण बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दरम्यान, दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी सोमवारी नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीतील संभाव्य अडचणींबाबत प्रवाशांना इशारा दिला. मार्गदर्शक सूचनेनुसार, विरोधी पक्षाच्या प्रस्तावित आंदोलनादरम्यान ट्रॅफिक व्यवस्थापन आणि सुरक्षा कायम ठेवण्यासाठी जवळपास 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून काही मार्ग बदलण्यात आले आहेत.
धौला कुआं फ्लायओव्हर, झंडेवालान, पटेल चौक, पंचकुइयां, कनॉट प्लेस, मंडी हाउस, लोधी रोड फ्लायओव्हर, भीकाजी कामा प्लेस आणि मोती बाग फ्लायओव्हर यांसह अनेक मुख्य रस्ते आणि चौकांवर याचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय जंतर-मंतर रोड, अशोक रोड, संसद मार्ग आणि टॉल्स्टॉय मार्ग या मार्गांवर प्रवाशांना बंदी किंवा उशिराचा सामना करावा लागू शकतो.