जंतरमंतर प्रकरणी सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिजीत दिपके दिल्लीत येण्याआधीच पोलिसांनी कारवाई केली; अटकेवर दिपके यांनी संताप व्यक्त केला आणि अपहरणाचा आरोप केला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके दिल्लीत येणार होते आणि जंतरमंतरवर पक्षाचे आंदोलन नियोजित होते. त्याच्या अगदी आधी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी दिल्लीत अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
जंतरमंतर हे मैदान आंदोलनाची जागा म्हणून रद्द करण्यात आले होते. तरीही तिथे जाऊन घोषणाबाजी केली आणि तिरंगा फडकावला, या प्रकरणी त्यांना तुरुंगात टाकल्याचे सांगितले जात आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सौरव, आशुतोष आणि अजिंक्य शिंदे यांच्या अटकेवर सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे.
दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तिरंगा फडकावणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी केला. तिरंगा फडकावणे गुन्हा असेल, तर नरेंद्र मोदींनी ते स्पष्ट सांगावे, असे ते म्हणाले. ही आरएसएसची विचारधारा आहे, असे सांगून त्यांनी म्हटले की, यांनी स्वतः कितीतरी वर्षे आपल्या शाखेवर तिरंगा फडकावला नव्हता, त्यामुळे त्यांना आजही तिरंग्याशी प्रॉब्लेम आहे.
आपल्या सहकाऱ्यांना डिटेन केले गेले आहे, असा आरोप दिपके यांनी केला. त्यांना कुणाशीही बोलू दिले जात नाही, त्यांचे फोन हिसकावून घेतले गेले आहेत आणि वकिलांशी भेटू दिले जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एकप्रकारे त्यांचे अपहरणच केले गेले आहे, तसेच ते कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत हेही सांगितले जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
दिपके यांनी पुढे म्हटले, "माझ्या सहकाऱ्यांना तुरुंगात डांबून किंवा जंतरमंतर बंद करून आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही."
यापूर्वी शनिवारी (१० ऑक्टोबर) अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका दिल्लीत दाखल झाले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना विमानातूनच ताब्यात घेतले आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले. सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनासाठी परवानगी मागण्याकरिता पक्षाने सोमवारी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली होती.
मात्र बुधवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे पोलिसांनी जंतरमंतर घटनेच्या संदर्भात अजिंक्य शिंदे यांच्यासह या दोन प्रमुख नेत्यांना अटक केली. योगायोगाने आजच, १४ ऑक्टोबरला, आशुतोष रांका यांचा वाढदिवसही आहे.