बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:11 IST

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पतीची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. बुधवारी (14 ऑक्टोबर) राजेंद्र शिंदे पुन्हा गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे का, असे विचारले असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.

याआधी राजेंद्र शिंदे यांची सुमारे नऊ तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गेल्या दीड तासापासून ते गुन्हे शाखेच्या कार्यालयात असून गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांची चौकशी सुरू आहे.

डीसीपी अमरसिंग जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चौकशी हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सुरू आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या संपर्कात असलेल्या किंवा त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तपासात मिळणारे पुरावे आणि धागेदोरे यांच्या आधारे संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. अटकेत असलेल्या आरोपींकडेही चौकशी सुरू असून राजेंद्र शिंदे यांचीही चौकशी केली जात आहे, असे जाधव यांनी सांगितले.

प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांची ठाण्यातील मानपाडा परिसरात 29 सप्टेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पूर्णेकर यांच्यावर नुकतीच एक वैद्यकीय शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे घटनेच्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते नवरात्रोत्सवाची वर्गणी गोळा करण्यासाठी बाहेर गेले असताना पूर्णेकर आपल्या कार्यालयात एकटेच होते.

त्याच वेळी हेल्मेट घातलेले आणि चेहरा झाकलेले बंदूकधारी अचानक त्यांच्या कार्यालयात घुसले. हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर जवळून थेट 7 गोळ्या झाडल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी धारदार शस्त्राने प्राणघातक वारही केले आणि तेथून पसार झाले. पूर्णेकर यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्णेकर यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी त्यांच्या ऑफिसची पूर्ण रेकी केली होती. ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने (SIT) तपास करून प्रकाश उर्फ 'पप्या शिंदे', संतोष कनोजिया उर्फ 'टल्ली' आणि इतर साथीदारांना उत्तर प्रदेश व इतर ठिकाणांहून अटक केली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि उत्तर प्रदेश एसटीएफच्या माहितीनुसार, जुन्या राजकीय-सामाजिक वैमनस्यातून हा हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास सध्या ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ