एल. मुरुगन यांचा केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
माहिती व प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी मंत्रिपद आणि राज्यसभेची खासदारकी एकाच वेळी सोडली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा एकाच वेळी राजीनामा दिला आहे. मुरुगन हे केंद्र सरकारमध्ये बऱ्याच काळापासून राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबतच संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मुरुगन यांनी 'एक्स'वर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. एका मजुराचा मुलगा ते केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री हा प्रवास आपल्यासाठी भाग्याचा होता, असे त्यांनी म्हटले आहे. आता तळागाळात परत जाऊन कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे आणि तमिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे, असे मुरुगन यांनी स्पष्ट केले.
मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सविस्तर पत्रही लिहिले असून त्यात आपल्या पुढच्या योजनांची रूपरेषा मांडली आहे. आता आपला संपूर्ण वेळ तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी द्यायचा आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये पाच वर्षे काम करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. ज्या कामामुळे आपल्याला सार्वजनिक जीवनात येण्याची प्रेरणा मिळाली, त्या कामाकडे आता परतायचे आहे. तमिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करणे आणि राज्यात २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला तयार करणे हे आपले प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीतील निवासस्थानी केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांची भेट घेतली. रिजिजू यांनी या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे रिजिजू यांनी म्हटले आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले.