शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
23:33 IST

२०२४ च्या विधानसभेत आमचा मुद्दाम पराभव घडवला गेला, पुण्यात संजय राऊत यांचा आरोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना ज्ञानेश कुमार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. SIR प्रक्रियेवरूनही त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

२०२४ च्या विधानसभेत आमचा मुद्दाम पराभव घडवला गेला, पुण्यात संजय राऊत यांचा आरोप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. या तिघांनी मिळून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला, असा दावा राऊत यांनी केला. ही निवडणूक शिवसेनेनेच जिंकली होती, हे आता लोकांनाही पटू लागलं आहे, असंही ते म्हणाले.

सध्या देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. SIR प्रक्रियेतला घोळ आणि फॉर्म ६ मधला भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून त्यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. विरोधी इंडिया आघाडीसह सीजेपीनेही त्यांच्याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे वक्तव्य केलं.

राऊत म्हणाले, की देशात पुन्हा एकदा वातावरण बदलू लागलं आहे. त्यामुळे मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे, हे स्पष्ट होत आहे. बाकी सगळं ड्युप्लिकेट आहे, असं ते म्हणाले. हा खेळ आता सुप्रीम कोर्ट संपवणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. मागच्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने आणि तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयाने जी पापं केली, त्यामुळेच आयोगाविरोधात देशात संताप उसळला आहे, असा दावा त्यांनी केला.

2024 मध्येही विधानसभेत शिवसेनाच जिंकली होती, असं सांगून राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्या कारनाम्यांचा उल्लेख केला. ते आता समोर आले आहेत आणि त्यामुळेच आमचा पराभव घडवला गेला, असा आरोप त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांचा निकाल लावून लगेच निवडणुका झाल्या, तर मिंधे गट आणि भाजपचं नावही उरणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

जनतेच्या प्रश्नांवर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार बोलायला तयार नाहीत, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिवसाआड दिल्लीच्या दौऱ्यावर असतात, तर राज्यात जमिनीवर फक्त शिवसेनेचं काम सुरू आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल राऊत म्हणाले, "ज्ञानेश कुमार एक नंबरचे भ्रष्ट आणि घोटाळेबाज माणूस आहेत. ते सध्या कुठे पळून गेलेत? फरार आहेत का? SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा झालाय हे आम्ही आधीपासून सांगत होतो, पण आयोगातील इतर दोन निवडणूक आयुक्तांनीही या निर्णयावर असहमती दर्शवल्याने आता हा विषय संपूर्ण देशात पेटला आहे."

विरोधी पक्षांच्या आरोपांवर फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचा समाचार घेताना राऊत म्हणाले, "भाजपाला ज्ञानेश कुमारांचा एवढा पुळका का आला आहे? देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक आयोगाचा वकील म्हणून नेमले आहे का? निवडणूक आयोग जर घटनात्मक संस्था असेल, तर त्यांना त्यांची बाजू मांडू द्या."

SIR च्या नावाखाली मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. ते म्हणाले, "SIR प्रक्रियेत मृत मतदारांची नावे काढण्याला आमचा विरोध नाही, पण जिथे शिवसेनेला मतदान जास्त होते तिथे नावे वगळायची किंवा पश्चिम बंगालमध्ये एका विशिष्ट समुदायाची नावे काढून त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचे, याला SIR धोरण म्हणत नाहीत. हा थेट लोकशाहीवर दरोडा आहे."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ