ममता बॅनर्जींचा आरोप: दोन तास प्रिझन व्हॅनमधून फिरवले, द्वारका नॉर्थ ठाण्यात धरणे
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली पोलिसांवर अपहरणाचा आरोप केला असून द्वारका नॉर्थ पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनावरून देशभरातले राजकीय वातावरण तापले आहे. पोलिसांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या साथीदारांना विमानातूनच ताब्यात घेतले. त्यानंतर ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांसारख्या विरोधी नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले. यामुळे देशभरात मोठा गदारोळ उडाला आहे.
याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी असा दावा केला की, दिल्ली पोलिसांनी आपले आणि पाच खासदारांचे अपहरण केले आणि सुमारे दोन तास प्रिझन व्हॅनमधून फिरवले.
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, द्वारका नॉर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्यासोबत पाच खासदार धरणे आंदोलन करत आहेत. जंतर-मंतरवर जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आपल्याला रोखले आणि ताब्यात घेतले, असाही आरोप त्यांनी केला.
आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, "संध्याकाळचे ४ वाजले आहेत. आम्हाला ज्या 'द्वारका नॉर्थ' पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे, तिथे आमच्या ४ खासदारांसह आम्ही धरणे आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला किडनॅप करून नेण्यात आले आणि दोन तास एका पोलीस व्हॅनमधून फिरवण्यात आले. मी आज रात्री कोलकात्याला परतणार नाही; आणि आज तरुण व इतरांविरुद्ध जे काही घडत आहे, त्या निषेधार्थ मी सोमवारी होणाऱ्या 'I.N.D.I.A' आघाडीच्या मोर्चात सहभागी होईन."
या कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही 'सुपर आणीबाणी' असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांशी संबंधित आंदोलने दडपली जात आहेत, असा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
शनिवारी रात्री आपण कोलकात्याला परतणार नसून पोलीस ठाण्यातच धरणे सुरू ठेवणार आहोत, असे त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान पाणीही न पिण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गरज पडली तर 48 ते 72 तास आंदोलन सुरू ठेवण्याची तयारी आहे, असेही त्या म्हणाल्या.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि SIR प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र या आंदोलनाला परवानगी नाही, असे सांगत दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जंतर-मंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 1,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही विमानतळावर पोलिसांनी आपल्याला आणि सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीतल्या या कारवाईवरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. आंदोलनाचा अधिकार आणि पोलिसांची कारवाई यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.