अमरावतीत इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, SIR प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी
विशेष सखोल पुनरावृत्ती प्रक्रियेतील अनियमितता आणि मतदारांची नावे वगळल्याच्या प्रकाराविरोधात इंडिया आघाडीने अमरावतीत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेतील अनियमितता, मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धत यांच्या विरोधात अमरावतीत इंडिया आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गर्ल्स हायस्कूल चौकातून दुपारी साडेबारा वाजता मोर्चा सुरू झाला. महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. निवडणूक आयोग आणि शासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले आणि मिलिंद चिमोटे आदींनी केले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचला, तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी आवारात जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलीस आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आंदोलक कार्यालयाच्या आवारात पोहोचले. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्याच्या सगळ्या प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, पात्र मतदारांची नावे तातडीने पुन्हा नोंदवली जावीत, मतदारांना आक्षेप नोंदवण्याची पुरेशी संधी मिळावी आणि मतदार यादीतील बदलांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, असे त्यात म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत जे आरोप झाले आहेत, त्यांची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता आणि घटनात्मक स्वायत्तता राहील याची खात्री करावी, तसेच नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करावे, असेही त्यात म्हटले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठवला, याचा उल्लेख इंडिया आघाडीने केला. आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचाही आघाडीने निषेध केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार कायम राहावा, अशी मागणीही करण्यात आली. शासनाने या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहावे, असे आंदोलकांनी म्हटले. 'लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा', अशा घोषणा देत हे आंदोलन झाले.
माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, मी राज्याची मंत्री आणि आमदार राहिलेली असताना माझ्या मुलांच्या मतदान ओळखपत्रात त्रुटी काढण्यात आली, मग सर्वसामान्यांचे काय? मूळ मुद्दा SIR आणि वोट चोरीचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. भाजपने ॲप तयार करून त्याचा एक्सेस तहसीलदार आणि इतरांना दिला आहे, कोणती नावे डिलीट करायची हे ठरवले जात आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला. ज्ञानेश कुमार यांनी पूर्ण देशात गोंधळ घातला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे त्या म्हणाल्या. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते, तीही निषेधार्ह आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्येही ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. कुमार यांनी देशभरात गोंधळ निर्माण केला असून त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.