एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्ली, मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये आंदोलन
मुंबईत तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याने वातावरण तापलं असून, काँग्रेसनं देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एसआयआर (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या मुद्द्यांवरून दिल्लीसह मुंबई, नागपूर आणि नाशिक या शहरांत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनांनंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काँग्रेसनं देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र दिल्लीत पोहोचताच त्यांना विमानतळावर ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर नियोजित आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे आल्याचं सांगण्यात येत आहे. या घडामोडींनंतर दिल्ली पोलिसांनी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात मोठं आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षातील सर्व राज्यांतील आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचं वृत्त आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी दिल्लीत पोहोचावं, अशा सूचना पक्षनेतृत्वाकडून देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनाही दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांकडून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
मुंबईतही याच मागणीसाठी आंदोलन झालं. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आंदोलक जमा होऊ लागताच पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत कारवाई सुरू केली. आंदोलनासाठी जात असताना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.
या घटनेनंतर पोलीस स्टेशनबाहेर शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तुषार गांधी यांची सुटका होईपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.
नाशिकमध्ये अशोक स्तंभ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर मोर्चा काढण्यात आला. त्यात वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नागपूरमध्येही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.
एसआयआरच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.