बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:32 IST

कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील ३४१० शेतकरी, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी तिसरी यादी प्राप्त झाली आहे. या यादीत जिल्ह्यातील ३४१० पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्य शासनाने ही यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली.

यादीतील ३४१० शेतकऱ्यांपैकी ३१२ शेतकरी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत. उर्वरित ३०९८ शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांचे आहेत. शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जे यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेची अंमलबजावणी महाआयटीमार्फत ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. राज्यातील विविध बँकांनी एकूण 31 लाख 17 हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यानुसार 24 जुलै 2026 रोजी राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली. 11 सप्टेंबर 2026 रोजी 4 लाख 20 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आली, तर 12 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या यादीतील 3410 शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी तिथे आपले नाव तपासून 31 मार्च 2026 रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करावी. त्यानंतर जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.

या यादीतील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ केले जाणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या 'हेअरकट' धोरणानुसार त्यांची कर्ज खाती निरंक केली जाणार आहेत.

पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे तिसऱ्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व 3410 शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ