अमरावतीत इंडिया आघाडीचा मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला, SIR ची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
विशेष सखोल पुनरावृत्ती प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात इंडिया आघाडीने अमरावतीत मोर्चा काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अमरावतीत इंडिया आघाडीने विशेष सखोल पुनरावृत्ती म्हणजेच SIR च्या विरोधात जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा नेला. या प्रक्रियेत अनियमितता झाली, मतदार यादीतून अनेकांची नावे वगळली गेली आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका आहे, असा आघाडीचा आक्षेप आहे.
दुपारी साडेबारा वाजता गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. निवडणूक आयोग आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या गेल्या. "लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा" अशी घोषणा मोर्चाभर ऐकू येत होती.
मोर्चाच्या अग्रभागी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर होत्या. त्यांच्यासोबत खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप चालत होते. काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, तसेच विलास इंगोले आणि मिलिंद चिमोटे यांच्यासह आणखी काही नेतेही यात होते.
मोर्चा कचेरीच्या प्रवेशद्वारापर्यंत आला, तेव्हा पोलीसांनी गेटवरच सर्वांना रोखण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये जायचे म्हणून आंदोलक पुढे सरसावले आणि पोलीस व आंदोलक यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद रंगला. परिसरात थोडा वेळ तणाव जाणवत होता. अखेर आंदोलक आवारात पोहोचले.
यानंतर आघाडीच्या शिष्टमंडळाने सभागृहात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. SIR दरम्यान मतदारांची नावे काढून टाकण्याच्या सगळ्या प्रकाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, पात्र मतदारांची नावे तातडीने यादीत परत घ्यावीत, हरकती नोंदवायला मतदारांना पुरेसा वेळ आणि संधी मिळावी आणि यादीत काय बदल झाले हे उघडपणे लोकांना कळावे, अशा मागण्या त्यात आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजाविषयी जे आरोप झाले आहेत, त्यांचीही निःपक्षपाती चौकशी व्हावी आणि दोषी आढळले तर कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी, असे शिष्टमंडळाने सुचवले. आयोगाच्या निर्णयांमध्ये पारदर्शकता असावी, तिची घटनात्मक स्वायत्तता टिकवली जावी आणि नागरिकांच्या मतदानाच्या हक्काला धक्का लागू नये, असेही निवेदनात लिहिले आहे.
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेबद्दल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आवाज उठवला होता, याचा आघाडीने निवेदनात उल्लेख केला. आंदोलनादरम्यान पोलीसांनी केलेल्या कारवाईचा आघाडीने निषेध नोंदवला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार कायम राहिला पाहिजे, अशी मागणीही केली गेली. सरकारने या सर्व मुद्द्यांकडे गंभीरपणे पाहावे, असे आंदोलकांनी सांगितले.
माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. त्या म्हणाल्या, "मी राज्याची मंत्री, आमदार राहिलेली असताना माझ्या मुलांच्या मतदान ओळखपत्रात त्रुटी काढण्यात आली. मग सर्वसामान्यांचं काय? त्यामुळे मूळ मुद्दा SIR आणि वोट चोरीचा आहे." भाजपने ऍप बनवून त्याचा एक्सेस तहसीलदार आणि इतरांना दिला असून कोणती नावे डिलिट करायची हे ठरवले जात आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला. ज्ञानेश कुमार यांनी देशभर गोंधळ घातला आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, तेही निषेधार्ह आहे, असे ठाकूर म्हणाल्या. समाजमाध्यमांवरील पोस्टमध्येही त्यांनी हीच भूमिका मांडली. ज्ञानेश कुमार यांनी देशभरात गोंधळ निर्माण केला आहे, त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. SIR आणि वोट चोरी करणाऱ्या कुमार यांनी पायउतार व्हावे, यासाठीच अमरावतीत हा मोर्चा काढला गेला, असेही त्यांनी लिहिले.