नागपूर पदवीधर निवडणूक: सुधाकर कोहळेंना विजयी करा, बावनकुळे यांचे चंद्रपुरात आवाहन
चंद्रपूरमध्ये भाजपच्या पदवीधर संवाद मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप-महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ च्या निवडणुकीत भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जावेत आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी हे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने बुधवारी महेश भवन येथे पदवीधर संवाद मेळावा झाला. त्यात ते बोलत होते.
या मेळाव्याला पालकमंत्री डॉ. प्रा अशोक वुईके, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार अनिल सोले, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रभारी अर्चना डेहनकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, की राज्यातील पदवीधरांशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सक्षम आणि सरकारशी समन्वय साधणारा प्रतिनिधी विधानपरिषदेत असायला हवा. मतदान करताना पदवीधर मतदारांनी कोणतीही चूक करू नये, असे सांगून ते म्हणाले की चुकीच्या उमेदवाराला दिलेले एक मत पदवीधरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर परिणाम करू शकते. म्हणून पदवीधरांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणाऱ्या सुधाकर कोहळे यांच्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
विद्यमान पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात पदवीधरांच्या प्रश्नांवर ठोस काम झालेले दिसले नाही. आंदोलनाच्या पलीकडे जाऊन सभागृहात हे प्रश्न मांडण्यात ते अपयशी ठरले, असा आरोपही त्यांनी केला. मागच्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करून विजय मिळवला, असा आरोप करत ते म्हणाले की, आता पराभवाची शक्यता दिसू लागल्याने जातीयवादाचा मुद्दा पुढे केला जात आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या कामाचा उल्लेख करून बावनकुळे यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. जोरगेवार कर्तृत्ववान आहेत, त्यांच्या आवाहनाला पदवीधरांनी साथ दिली तर पदवीधर आमदाराच्या माध्यमातून प्रश्न शासनदरबारी मांडून ते सोडवण्यासाठी ते सक्षमपणे प्रयत्न करू शकतात, असे बावनकुळे म्हणाले. कोहळे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आणि पदवीधर मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसकडून ईव्हीएम आणि इतर मुद्द्यांवरून संभ्रम निर्माण केला जात आहे. ज्या वेळी निवडणुकीत विजय मिळतो, त्याच वेळी ईव्हीएमबाबतची भूमिका बदलताना दिसते, आणि पक्षाची भूमिका सोयीस्कर आहे, असा आरोप त्यांनी केला. एसआयआरच्या मुद्द्यावरही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव झाला तर एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जातात, पण काँग्रेसची सत्ता असलेल्या ठिकाणी याच प्रक्रियेबाबत वेगळी भूमिका घेतली जाते, असा आरोप करून त्यांनी विरोधकांच्या या दुहेरी भूमिकेवर टीका केली. आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे फक्त उमेदवार निवडणे नाही, तर पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची संधी आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. म्हणूनच हे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप-महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा केले.
कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी सादर केलेल्या कवितेने उत्साह निर्माण झाला. ते म्हणाले: "विरोधकांचे कितीही झाले मेळावे आणि सोहळे, तरी निवडून येतील सुधाकर कोहळे! कारण निवडणूक प्रमुख आहेत चंद्रशेखर बावनकुळे, आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सहप्रमुख आहेत अनिल सोले, म्हणून निवडून येतील सुधाकर कोहळे!"
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.