नागपूर पदवीधर मतदारसंघ: अनिल सोले यांच्याशी गडकरींच्या बैठकीतून संपर्काचा प्रयत्न, पण फोन बंद; भाजपची चिंता
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढतीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (9 ऑक्टोबर) शेवटची मुदत असून भाजपचे बंडखोर अनिल सोले काय करतात, याकडे लक्ष लागले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील लढतीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (9 ऑक्टोबर) शेवटची मुदत आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले आपला अर्ज परत घेतात का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीच्या रणनीतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला हजर होते. बैठकीत सोले यांच्या भूमिकेवर सखोल चर्चा झाली. गडकरी यांनी सोले यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठकीतूनही सोले यांना फोन लावण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. एवढेच नाही, तर सोले यांच्या निकटवर्तीयांचेही मोबाईल बंद असल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.
प्राध्यापक सोले गेल्या दोन दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. काहींना सोले यांचे फोन बंद आढळले, तर काहींशी बोलणे होऊनही सोले यांनी अंतिम शब्द दिला नसल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नागपूर दौऱ्यात सोले यांच्या घरी स्वतः जाऊन आले होते. मात्र तेव्हाही सोले त्यांना भेटले नव्हते.
दरम्यान, आज संध्याकाळी पाच वाजता सोले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. नागपूरच्या महाल परिसरातील या कार्यालयाच्या उद्घाटनाचा संदेश समाजमाध्यमांवरही फिरत आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांच्या बडकस चौकातील कार्यालयात सोले यांचे प्रचार कार्यालय राहणार आहे. त्यामुळे सोले माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीत, असेच सध्याचे चित्र आहे. सोले यांचे बंड शमवण्यात भाजपच्या पक्षश्रेष्ठींना यश येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपपुढची डोकेदुखी एवढ्यावरच थांबलेली नाही. लोक जागृती मोर्चाच्या रमण सेनाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही बंडखोरीचे टेन्शन आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पदवीधर मतदारसंघासाठीच्या विधान परिषदेच्या मागच्या निवडणुकीत कराळे यांनी चांगले मतदान घेतले होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी काँग्रेससाठी चिंता वाढवणारी आहे.