पदवीधर निवडणुकीवरून भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत, उमेदवारी दिली नाही तरी लढणार, असे आल्हाद भांडारकर यांनी
नागपूर पदवीधर मतदारसंघातून आल्हाद भांडारकर यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपने उमेदवारी दिली नाही, तरी अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. या जागा विधानपरिषदेतील आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर येथे पदवीधर मतदारसंघाच्या जागा आहेत, तर अमरावती आणि पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागा आहेत. या निवडणुकीआधीच भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
आल्हाद भांडारकर यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तशी घोषणा केली असून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. भांडारकर हे शिक्षण महर्षी बापू साहेब लाखाणीकर यांचे नातू आहेत आणि अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. संघाशी एकनिष्ठ असलेल्या आल्हाद भांडारकरांच्या भूमिकेमुळे नागपूर पदवीधर निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
भाजपकडे उमेदवारी मागितली असली, तरी ती मिळेल याची निश्चिती नाही. त्यामुळे 5 किंवा 6 तारखेला ते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने उमेदवारी दिली नाही, तरीही आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी घोषणा भांडारकर यांनी केली आहे. फक्त नागपूर जिल्ह्यालाच प्राधान्य का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
"भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या इतर जिल्ह्यांमध्ये काय योग्य पदवीधर उमेदवार नाहीत का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या भांडारकरांचे भंडारा जिल्ह्यात मोठे शैक्षणिक जाळे आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अदिती पोहरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष दावा सांगत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पुणे पदवीधर मतदारसंघाचीही मागणी करण्यात आली आहे. या पुणे पदवीधर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर इच्छुक आहेत.
भाऊसाहेब आंधळकर यांनी यापूर्वी शिवसेनेकडून बार्शी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी ते इच्छुक आहेत. "मी पुणे पदवीधर मधून मोठी बांधणी केलीय. त्यामुळे पक्षाने मला डावलू नये," अशी मागणी भाऊसाहेब आंधळकर यांनी केली आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.