नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपची जोरदार तयारी, कॉल सेंटरमधून रोज ४० हजार मतदारांशी संपर्क
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पक्षाने कंबर कसली असून मतदारांशी थेट संपर्क साधणारे अभियान सुरू केले आहे. हा मतदारसंघ नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
भाजपच्या नागपूर वॉररूम कार्यालयात एक कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून रोज चाळीस हजार मतदारांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या मतदारसंघाशी भावनिक नाते आहे. फडणवीस यांचे वडील गंगाधराव फडणवीस याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून यायचे. तर गडकरी हेदेखील महाराष्ट्राच्या विधिमंडळात याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे प्रचाराला भाजपने पहिल्या दिवसापासून आपली ताकद झोकून दिली आहे.
मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला तर तब्बल ५८ वर्षे हा मतदारसंघ भाजप आणि जनसंघाच्या ताब्यात होता. मात्र २०२० मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. भाजपला या मतदारसंघात कधी अपेक्षित नसलेला मोठा पराभव त्या वेळी पाहावा लागला आणि हा पराभव पक्षाच्या कमालीच्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने यंदाही तयारी सुरू केली आहे.
दुसरीकडे काँग्रेस पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. या वर्षी नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. वंजारी यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास अपेक्षित होता. मात्र या निवडणुकीत फक्त काँग्रेस मैदानात नाही, तर सरकारविरोधी समविचारी सर्व संघटना माझ्यासाठी मैदानात उतरल्या आहेत, असे आमदार वंजारी यांनी सांगितले.
काँग्रेसने भाजपपुढे असे मोठे आव्हान उभे केले असताना भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे हे आव्हान नेमके कोण स्वीकारते आणि भाजपला विजय कसा खेचून आणून देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नितीन गडकरी आणि गंगाधरराव फडणवीस यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले असल्याने भाजपसाठी ही जागा जिंकणे प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे भाजप आपला तगडा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.