नागपूर भाजपमध्ये बंडखोरी, कोहले यांच्या विरोधात माजी आमदार अनिल सोले मैदानात उतरणार
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपने सुधाकर कोहले यांना उमेदवारी जाहीर करताच माजी आमदार अनिल सोले यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीने माजी आमदार सुधाकर कोहले यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, याबद्दल गेला आठवडाभर उत्सुकता होती. ती आता संपली आहे आणि पक्षाने अखेर नाव स्पष्ट केले आहे. हे नाव अपेक्षेप्रमाणेच आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कोहले यांना मतदार नोंदणी प्रमुख करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. मात्र कोहले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
सोले हेदेखील 5 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नागपूर भाजपमधल्या या बंडखोरीमुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सोले यांच्यासारखा कष्टाळू आणि आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला माणूस बंड कसा करू शकतो, असे आश्चर्य राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
माजी आमदार अनिल सोले यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहशहर आणि गडकरी यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याने बंडखोरी करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
अनिल सोले 2014 मध्ये याच शहरातून विधान परिषदेचे सदस्य झाले होते. नितीन गडकरी लोकसभेत गेल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती आणि त्या जागेवर सोले यांना संधी देण्यात आली होती. आता सोले यांनी अर्ज भरला आणि ते रिंगणात राहिले, तर पक्षाचे अधिकृत उमेदवार कोहले यांना मोठा फटका बसू शकतो, अशी पक्षाला चिंता आहे.
परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी आमदार अनिल सोले यांच्याशी संपर्क साधून त्यांची समजूत काढायला आणि त्यांना आपली भूमिका बदलायला लावायला सुरुवात केली आहे. पक्षसंघटनेतूनही त्यांच्यावर अर्ज न भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. मतांची विभागणी टाळता यावी, हा त्यामागचा हेतू आहे.
दरम्यान, अनिल सोले यांच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे ही लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.