सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:35 IST

38 उमेदवारांची मतपत्रिका छोट्या छिद्रातून कशी जाणार? मुनगंटीवारांचा मतदान प्रक्रियेवर संताप

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतपत्रिका आणि बॅलेट बॉक्सवरून आक्षेप घेतला आहे.

38 उमेदवारांची मतपत्रिका छोट्या छिद्रातून कशी जाणार? मुनगंटीवारांचा मतदान प्रक्रियेवर संताप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला. बॅलेट बॉक्समध्ये मतपत्रिका सहजपणे जात नाही, असे सांगत त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतपत्रिका घडी केली की ती चांगलीच जाड होते. इतकी जाड घडी असलेली मतपत्रिका बॅलेट बॉक्समधील छोट्या छिद्रातून कशी आत टाकली जाणार, असा त्यांचा सवाल आहे. याचा कुठलाच विचार झालेला दिसत नाही, असे सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आचारसंहितेमुळे दुष्काळी प्रश्नांवर बैठक घेऊ न देणाऱ्या निवडणूक आयुक्तांवरही त्यांनी निशाणा साधला.

मतपत्रिका पेटीत टाकताना एखादी फाटली, तर ती अवैध ठरवू नका, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. चंद्रपूर शहरातील एफईएस कॉलेजमध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यंदा भाजपचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी मतदार भाजपच्या विकासकामांना साथ देतील, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारीही समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण 32262 मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने एकूण 58 मतदान केंद्रे उभारली आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 या वेळेत मतदान सुरळीत व्हावे म्हणून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारांना चार तासांची विशेष सुट्टी देण्यात आली आहे. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात 8.52 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, वर्धा येथील बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनीही मतदान प्रक्रियेदरम्यान घोळ होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. माझा वाढता प्रभाव सगळ्यांना खुपत आहे, असे ते म्हणाले. चंद्रपूरच्या भिसी केंद्रावर सहीच्या कारणावरून आपल्या प्रतिनिधीला अडवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. आमची अडवणूक करण्याचा हा कट आहे, असा दावा त्यांनी केला. एवढेच नाही, तर निवडणूक विभाग भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे, असा गंभीर आरोपही नितेश कराळे यांनी केला आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ