अनिल सोले यांची माघार, गिरीश व्यास यांचीही नाराजी दूर; पदवीधरमध्ये कोहळे विरुद्ध वंजारी लढत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे बंड शमले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी आली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अखेर थांबला आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करून प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे आणि सोले यांच्या बंडखोरीला पाठिंबा देणारे भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांचीही नाराजी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे नागपूर भाजपमधील वाद निवळला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी आली आहे.
या वादाची सुरुवात कशी झाली, ते पाहिले तर भाजपने यंदा माजी आमदार सुधाकर कोहळे यांना संधी देऊन मैदानात उतरवले होते. मात्र याच मतदारसंघातून लढण्यासाठी अनिल सोले हेही इच्छुक होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला. त्यानंतर गिरीश व्यास यांनीही सोले यांच्या भूमिकेला जाहीर समर्थन दिले. त्यामुळे पदवीधर मतदारसंघात भाजपसमोर स्वतःच्याच पक्षातून मोठे आव्हान उभे राहिले होते.
हा तिढा सोडवण्यासाठी काल (12 ऑक्टोबर) नागपुरात भाजपची महत्त्वाची बैठक झाली. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक नियोजन आणि रणनीती ठरवणे हा या बैठकीचा उद्देश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारीही हजर होते. बंड कसे शमवायचे, यावरही बैठकीत चर्चा झाली.
बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सोले यांच्याशी संवाद साधून त्यांची मनधरणी केली. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही सोले यांच्या घरी गेले होते. मात्र त्या वेळी सोले बाहेर असल्यामुळे त्यांची चव्हाण यांच्याशी भेट झाली नव्हती.
अखेर वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देत अनिल सोले यांनी माघार घेतली आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा दिला. कोहळे यांना निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल सोले हे वरिष्ठ नेते आहेत आणि नागपुरात भाजप उभी करण्यात त्यांचा वाटा राहिला आहे. कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम सोले करत आले आहेत. पक्षाबद्दल आपली नाराजी नाही, तर कार्यपद्धतीबद्दल आहे, असे सोले यांनी सांगितले होते. त्यांची नाराजी एखाद्या निर्णयाबद्दल नव्हती, तर निर्णय कसे घेतले जातात, त्या प्रक्रियेबद्दल होती. निर्णय घेताना जास्तीत जास्त लोकांशी बोलले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या तक्रारींची नोंद घेतली असून पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे ठरवले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सोले आणि व्यास यांची नाराजी दूर झाल्यामुळे आता नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात थेट लढत होणार आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.