विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी आज शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी आज, शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
पदवीधरच्या तीन जागा छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर विभागात आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागा अमरावती आणि पुणे विभागात आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात आठ जिल्ह्यांत मतदान होत आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधरसाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथे मतदान आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम इथे मतदान होत आहे. नागपूर पदवीधरसाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली इथे मतदान आहे.
प्रशासनाने पाचही मतदारसंघांसाठी जय्यत तयारी केल्याचा दावा केला आहे. एकूण दोन हजार ४१९ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून १० लाख ६८ हजार ७२ मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारराजा कोणाला कौल देतो आणि विधान परिषदेच्या मैदानात नेमके कोण बाजी मारतो, हे निकालातच समजेल.
पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महायुतीत झालेली बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजी यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची धास्ती वाढली आहे. मविआमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राज्यातील या पाचही मतदारसंघांचा आढावा घेऊया.
पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण मतदार ६१ हजार ९४० आहेत. इथे भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने जयंत आसगावकर यांना संधी देऊन आव्हान उभे केले आहे. शिवसेनेचे उमेदवार सचिन सानप आहेत, तर दत्तात्रय सावंत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार तीन लाख ८८ हजार आहेत. इथे भाजपने स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या हर्षदा देशमुख जाधव मैदानात आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार दोन लाख ५८ हजार ६३७ आहेत. नागपुरात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सामना रंगणार आहे. तिकडे राष्ट्रवादीचे नितेश कराळे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.