नागपूर पदवीधर निवडणूक: चंद्रपुरात मुनगंटीवारांचा मतदारांशी संवाद, कोहळेंना मत देण्याचे आवाहन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज येथे 'संवाद सेतू' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमात पदवीधर मतदारांशी संवाद साधला. भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडू शकेल असा सक्षम प्रतिनिधी निवडणे किती महत्त्वाचे आहे, हे मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले. मतदान करताना मत अवैध ठरणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ हा कार्यक्रम झाला. येत्या २३ ऑक्टोबरला कोहळे यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर, प्राचार्य लियाकत अली, श्रीमती शोभना, राजदा सिद्दिकी, जमीर शेख, नागाराजू यश बांगडे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. भारतीय संविधानाने विधानपरिषदेच्या माध्यमातून पदवीधरांना प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे. पदवीधरांचा प्रतिनिधी हा फक्त सभागृहाचा सदस्य नसतो. शिक्षणासह समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून सरकारला आवश्यक निर्णय घ्यायला भाग पाडणारा तो एक दुवा असतो. त्यामुळे पदवीधर मतदारांनी जात-पात आणि धर्माचा विचार न करता उमेदवाराची कार्यक्षमता, अनुभव आणि प्रश्न मांडण्याची क्षमता पाहून मतदान करावे, असे ते म्हणाले.
सुधाकर कोहळे यांना विधानसभेचा अनुभव आहे आणि पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पदवीधर मतदारसंघातून कोहळे यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली, तर शिक्षण आणि पदवीधरांशी संबंधित प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येईल, असेही ते म्हणाले.
शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचे आणि समाजात बदल घडवण्याचे प्रभावी साधन आहे, असे सांगत मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. वित्तमंत्री असताना चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. मूल येथे कृषी महाविद्यालय आणले, महिलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ५० एकर जागेत एसएनडीटीचे केंद्र उभे राहत आहे, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता मिळवून दिली आणि पुढील वर्षी बीडीएस महाविद्यालय आणण्याचाही प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात वेगाने पुढे जावा, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी मिळाव्यात आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीतले अडथळे दूर व्हावेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. भविष्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही समस्या आली, तर त्यांच्या शैक्षणिक न्यायहक्कांसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
येत्या २३ ऑक्टोबरला नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. प्रत्येक पदवीधर मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे मुनगंटीवार यांनी या वेळी सांगितले. मतदान करताना मत अवैध ठरणार नाही याची विशेष काळजी घ्यावी आणि मत अचूक नोंदवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.