अनिल सोले आज माघार घेतील, परिणय फुके यांना विश्वास; सोले दोन दिवस नॉट रिचेबल
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांचा फोन बंद आहे. ते आज अर्ज मागे घेतील, असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार अनिल सोले नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे बंडखोरी थंड करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना जबर धक्का बसताना दिसतो आहे. एकीकडे पक्षश्रेष्ठींसह भाजपचे नेते सोले यांची सतत मनधरणी करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते परिणय फुके यांनी सोले आज उमेदवारी मागे घेतील, असा विश्वास व्यक्त केला. फुके यांच्या म्हणण्यानुसार, अनिल सोले हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोले यांच्याशी बोलले आहेत, आणि आज नितीन गडकरी साहेब बोलले, तर सोले नक्की माघार घेतील, असे फुके म्हणाले.
सोले अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावरच्या प्रेमापोटी काही नेते त्यांना मदत करत असतीलही, असेही फुके यांनी सांगितले. पण विदर्भात भाजपमध्ये कुणी बंडखोरी केली, तर त्यातून मार्ग काढण्याचे काम सोले करायचे. त्यामुळे ते स्वतःही माघार घेतील, असा या आधीचा इतिहास सांगत फुके यांनी सोले यांच्या माघारीबद्दल विश्वास दाखवला.
उमेदवारीबद्दल बोलताना फुके म्हणाले की, आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी अशी सर्वांची इच्छा असते. मात्र ज्या पक्षाची जितकी ताकद, त्यानुसार उमेदवारी देण्यात आली. कोणताही उमेदवार निवडून आला, तरी महायुती म्हणून तो जनतेचा आवाज मांडेल. आपण राजकारणात लोकांच्या सेवेसाठी आलो आहोत, त्यामुळे कोणते पद असो वा नसो, काही फरक पडत नाही, असेही आमदार फुके म्हणाले.
फुके यांनी आणखी काही मुद्दे मांडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून राज्याची स्थिती सांगितली, त्याची दखल घेऊन पथक येईल आणि महाराष्ट्राला दुष्काळासाठी मोठी मदत मिळेल, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते ऐकत नाहीत, राहुल गांधी यांची पप्पूची भूमिका अजून कायम आहे, अशी टीकाही फुके यांनी केली.
या मतदारसंघातून अनिल सोले पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण यंदा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही आणि सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी सोले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्याच दिवशी संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी गेले आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा सोले आणि चव्हाण यांची भेट झाली नाही. तेव्हापासून सोले सतत नागपूरच्या बाहेर आहेत आणि गेले दोन दिवस त्यांचा फोन बंद असल्याची माहिती आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या रणनीतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. पक्षाचे प्रमुख नेते हजर असलेल्या या बैठकीत सोले यांच्या भूमिकेवर सखोल चर्चा झाली. गडकरी यांनी सोले यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आणि बैठकीतूनही त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. सोले यांच्या जवळच्या लोकांचे मोबाईलही बंद असल्याने भाजपची चिंता वाढली आहे.
दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. असे असताना आज संध्याकाळी पाच वाजता सोले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांच्या बडकस चौकातील कार्यालयात सोले यांचे प्रचार कार्यालय असणार आहे.