सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:46 IST

ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी ट्रायचे पाऊल, ओटीपीचा फॉरमॅट बदलणार

नोटिफिकेशनमध्ये ओटीपी दिसणार नाही, मेसेजमध्ये कंपनीचे नाव आणि कोडची मुदत असेल. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यातून लोकांना वाचवण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) तयारीत आहे.

ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी ट्रायचे पाऊल, ओटीपीचा फॉरमॅट बदलणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या जाळ्यातून लोकांना वाचवण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आता महत्त्वाची पावले उचलण्याच्या तयारीत आहे. वन-टाईम पासवर्ड म्हणजे ओटीपी पाठवण्याच्या पद्धतीत आणि त्याच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे.

सध्या अनेकदा मोबाईलवर ओटीपी आला की युजर्स फक्त नोटिफिकेशनमधूनच नंबर वाचतात आणि पुढे जातात. अशा वेळी ते फसवणुकीला बळी पडतात. हा प्रकार थांबवण्यासाठी ट्रायने काही कडक नियमांची आखणी केली आहे. हे नवे बदल नेमके काय आहेत, ते पाहूया.

पहिला बदल म्हणजे नोटिफिकेशन प्रीव्यू बंद होणार आहे. भविष्यात फोनवर ओटीपी आला तर तो थेट नोटिफिकेशनमध्ये दिसणार नाही. ओटीपी पाहण्यासाठी युजरला मेसेजिंग अॅप उघडावे लागेल. त्यामुळे फोनवर नजर ठेवून किंवा लांबून ओटीपी चोरणाऱ्यांना आळा बसेल.

दुसरा बदल फॉरमॅटबद्दल आहे. बँका, ई कॉमर्स कंपन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी एकसमान आणि ठराविक फॉरमॅट तयार केला जाईल. हा कोड लॉग इन करण्यासाठी आहे, पेमेंटसाठी आहे की आणखी कशासाठी, हे त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलेले असेल.

तिसरा बदल कंपनीची ओळख आणि मुदत यांच्याबद्दल आहे. मेसेजमध्ये कोड पाठवणाऱ्या कंपनीचे नाव दिले जाईल. तसेच तो कोड किती वेळ व्हॅलिड राहील, याची सविस्तर माहितीही दिली जाईल.

सायबर गुन्ह्यांचा आलेख सतत वर चढतो आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर 2021 मध्ये सुमारे 2.62 लाख तक्रारी दाखल झाल्या होत्या. 2025 पर्यंत हा आकडा वाढून 24.02 लाखांवर पोहोचला आहे. ऑनलाईन फसवणुकीत लुटली गेलेली रक्कम 551 कोटी रुपयांवरून वाढून 22,495 कोटी रुपयांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रायची ही नियमावली खूप महत्त्वाची मानली जात आहे.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते फक्त फॉरमॅट बदलल्याने एका रात्रीत सायबर गुन्हे पूर्णपणे थांबणार नाहीत, कारण भामटेही नवनवीन आयडिया शोधून काढतात. आजकाल फसवणुकीसाठी फक्त एसएमएसच नव्हे, तर व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचाही वापर केला जात आहे.

तरीही या बदलांमुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असे तज्ज्ञ सांगतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवर आलेला ओटीपी विचार न करता शेअर करू नका, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. बँक किंवा पेमेंट अॅपचा संशयास्पद मेसेज आला तर लगेच आपले खाते तपासावे आणि गरज वाटल्यास पेमेंट्स त्वरित ब्लॉक करावेत, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ