सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
06:52 IST

मानकापूर स्टेडियमवरील मतमोजणी केंद्र आणि निवडणूक तयारीचा निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घेतला आढावा

नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मानकापूर स्टेडियमवरील मतमोजणी केंद्र आणि निवडणूक तयारीचा निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घेतला आढावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर, दि. १८ - नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज नागपुरात मानकापूर स्टेडियम येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली.

त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना देऊन सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मानकापूर स्टेडियमवर डॉ. कांबळे यांनी मतमोजणी टेबलची रचना आणि बैठक व्यवस्था पाहिली. उमेदवार आणि पोलिंग एजंट यांच्या बसण्याची सोय कशी केली आहे, तेही त्यांनी पाहिले. मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केलेल्या 'स्ट्रॉंग रूम'चीही त्यांनी पाहणी केली.

मतमोजणीच्या दिवशी गाड्यांची गर्दी होणार असल्याने पार्किंग व्यवस्था कशी आहे, हेही त्यांनी तपासले. तसेच याच स्टेडियमवरील नागपूर जिल्ह्याच्या 'साहित्य स्वीकृती केंद्राची' माहितीही त्यांनी घेतली. या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरपंच भवन येथून नागपूर जिल्ह्यातील पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहेत. डॉ. कांबळे यांनी सरपंच भवनाला भेट देऊन पार्ट्यांच्या प्रस्थानाच्या तयारीचा आढावा घेतला. तिथे मतपत्रिकांसाठी तयार केलेली स्ट्रॉंग रूम, साहित्य वितरणासाठी मांडलेले टेबल आणि गाड्यांच्या ये-जा करण्याची व्यवस्था त्यांनी पाहिली.

यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉ. कांबळे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या तयारीचा सखोल आढावा घेतला. निवडणूक शाखेने निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी या वेळी सांगितले की, निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून ती पूर्णत्वास आली आहे. बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त विभागीय आयुक्त तुषार मठकर, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर होते.

निवडणूक विभागातर्फे कळविण्यात आले आहे की, निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांचा निवासाचा पत्ता कॉटेज नं. ७ रवी भवन, नागपूर असा आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८२०८५४०१९० असा आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ