मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:42 IST

नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपची सुधाकर कोहळे यांना उमेदवारी, आज भरणार अर्ज

नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपची सुधाकर कोहळे यांना उमेदवारी, आज भरणार अर्ज
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उमेदवार कोण होणार, याची उत्सुकता आठवडाभर होती. ती रविवारी अखेर संपली. पक्षाने अपेक्षेप्रमाणेच कोहळे यांना पसंती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कोहळे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोहळेच उमेदवार असतील, असे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनीही तसेच संकेत दिले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मध्यंतरी कोहळे यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक भूमिका दाखवली होती. मात्र दोन महिन्यांपासून माजी आमदार अनिल सोले यांचे नाव चर्चेत आले आणि तेव्हापासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली.

गेल्या रविवारी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक झाली. पण त्यातून कुठलेही नाव समोर आले नाही. कोहळे आणि सोले यांच्यासह मतदार नोंदणी सहप्रमुख सुधीर दिवे आणि गिरीश देशमुख यांच्या नावांचीही चर्चा सुरू होती.

सुधाकर कोहळे व्यवसायाने शिक्षक आहेत. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. या काळात ते नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्तही होते. २०१४ साली ते विधानसभेत पोहोचले. शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. २०१९ साली त्यांचा पत्ता साफ करून मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत कोहळे यांना पश्चिम नागपूरमधून उतरवण्यात आले. पण त्यांना यश मिळवता आले नाही.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोहळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात अर्ज कसा भरायचा इथपासून निवडणुकीच्या व्यूहरचनेपर्यंत चर्चा झाली.

प्रा. अनिल सोले यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. कोहळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही सोले अर्ज भरण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. दुसरीकडे भाजपकडे उमेदवारी मागणारे लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष अॅड. रमण सेनाड हे सोमवारी अर्ज भरणार आहेत.

या पदवीधर मतदारसंघात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मतदान २३ ऑक्टोबरला होणार आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ