राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर कराळे मास्तर भावुक, पक्षासाठी केलेल्या कामाचा हिशेब मांडला
नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या नितेश कराळे यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी झाली आहे. कारवाई चुकीची आहे, असे कराळे यांचे म्हणणे आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या पाच जागांमध्ये दोन शिक्षक मतदारसंघ आणि तीन पदवीधर मतदारसंघ यांचा समावेश आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी नागपूर पदवीधर मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या नितेश कराळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही हकालपट्टी सहा वर्षांसाठी आहे. याच मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अभिजीत वंजारी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. तरीही कराळे यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. अर्ज कायम ठेवल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
पक्षाने केलेल्या या कारवाईनंतर नितेश कराळे चांगलेच भावुक झाले आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. हकालपट्टीनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यात पक्षासाठी काय काय केले, याचा हिशेबच मांडला.
कराळे यांनी सांगितले की, त्यांनी पक्षासाठी 110 सभा घेतल्या आणि आता जनताच मतदानातून उत्तर देईल. हकालपट्टीची माहिती आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळाली, असेही ते म्हणाले. पक्षाच्या निर्णयाचा आपण स्वीकार करतो, मात्र ही कारवाई चुकीची आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण पक्षासाठी राज्यभर प्रचार केला, तसेच स्वतःच्या क्लासकडे दुर्लक्ष करून काम केले, असेही कराळे मास्तर यांनी सांगितले. काँग्रेसकडून पक्षावर दबाव टाकला जात असावा, अशी आपल्याला शंका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. उद्याच्या मतदानात मतदार आपली ताकद दाखवतील, असेही कराळे यांनी म्हटले आहे.
उद्या राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. यात नागपूर पदवीधर मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, पुणे शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघ यांचा समावेश आहे. मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधान परिषदेसाठी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.