राज्यात दोन दिवस विजांसह पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट जाहीर
हवामान विभागाने 18 आणि 19 ऑक्टोबरसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्रात मान्सूननंतरचे पावसाळी वातावरण अजूनही कायम आहे. हवामान विभागाने राज्यभरात पुढचे दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे.
विशेषतः दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही निवडक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच सगळीकडे एकसारखा पाऊस नसेल, तर काही ठरावीक भागांना याचा फटका बसू शकतो.
हवामान अंदाजानुसार, 18 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि वादळी पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे, उत्तर कोकणातील काही पट्ट्यांमध्ये मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.
18 ऑक्टोबरसाठी कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे. या दोन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर (शहर आणि घाट परिसर), सातारा घाट परिसर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतही यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी पावसाचा प्रभाव आणखी काही जिल्ह्यांत वाढण्याची शक्यता आहे. या दिवशी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (शहर व घाट परिसर), कोल्हापूर (शहर व घाट परिसर), सातारा (शहर आणि घाट परिसर), सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत यलो अलर्ट असणार आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिवमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे, या दिवशी विदर्भातील गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातही हवामानाचा मिजास बदलणार असल्याचे स्पष्ट होते.
वादळी वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटर असणार आहे. विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर थांबणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाच्या या स्थितीनुसार योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.