बेरोजगारांसाठी 'ब्लू डॉट् एआय इकॉनॉमी'; कौशल्य विभागाचे एकस्टेप फाउंडेशन, एनएसडीसीशी करार
नोकरी शोधणारे उमेदवार आणि उद्योग यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्यासाठी कौशल्य विभागाने एकस्टेप फाउंडेशन आणि एनएसडीसीसोबत सामंजस्य करार केले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबई : नोकरी शोधणारे उमेदवार आणि उद्योग यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'ब्लू डॉट् एआय इकॉनॉमी' हा उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबई उपनगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत तो प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि एकस्टेप फाउंडेशन यांच्यात बिगर-वित्तीय सामंजस्य करार झाला.
याच वेळी राज्यातील कौशल्य विकास, रोजगारक्षमता आणि आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विभागाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी (एनएसडीसी) देखील सामंजस्य करार केला. मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे दोन्ही करार झाले.
'ब्लू डॉट् एआय इकॉनॉमी' मधून शक्य तितक्या जास्त उमेदवारांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. उमेदवारांची कौशल्ये आणि उद्योगांना लागणारे मनुष्यबळ यांची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सांगड घालून रोजगार प्रक्रिया सोपी केली जाणार आहे. प्रायोगिक प्रकल्पाच्या अनुभवावरून या उपक्रमाचा विस्तार करता येईल का, हे तपासले जाईल.
या प्रकल्पासाठी निधीची तरतूद प्रस्तावित आहे. एकस्टेप फाउंडेशनने विकसित केलेला हा उपक्रम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या तत्त्वांवर आधारित आहे. त्यातून व्यक्तीची गरज आणि तिचे भौगोलिक ठिकाण पाहून स्थानिक अर्थव्यवस्थेतील रोजगाराची मागणी आणि पुरवठा शोधता येणार आहे. उपजीविका, शिक्षण व प्रशिक्षण, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक सहभाग ही क्षेत्रे यात येतात. नागरिक, उद्योजक, उद्योग आणि विविध संस्था एकमेकांशी जोडल्या जाऊन स्थानिक कौशल्ये, संसाधने व आर्थिक संधींचा चांगला वापर करता येईल, असे यात अपेक्षित आहे.
एनएसडीसीसोबतच्या करारानुसार कौशल्य योजनांचे मूल्यमापन, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ विकास, भविष्यकालीन कौशल्य प्रशिक्षण, उद्योगसंलग्न प्रशिक्षण आणि महिला उद्योजकता या क्षेत्रांत एकत्र काम केले जाईल. मुंबईत 'स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर' सुरू होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांत जागतिक कौशल्य प्रशिक्षण संस्था उभारल्या जातील.
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ऑटोमेशन, ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि डेटा विश्लेषण या आधुनिक क्षेत्रांत उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाईल. जर्मन, जपानी आणि इंग्रजी भाषांचे प्रशिक्षण, परदेशी नियोक्त्यांशी समन्वय आणि आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी उमेदवारांना मार्गदर्शन यांचाही त्यात समावेश आहे. उद्योगसंलग्न कौशल्य परिसंस्था आणि शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण मजबूत करण्यासोबतच महिला उद्योजकांना बाजारपेठ, डिजिटल वाणिज्य, आर्थिक साक्षरता आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करतील.
या कार्यक्रमाला विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. अमित सैनी, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, कौशल्य आयुक्तालयाचे उपआयुक्त सचिन जाधव, एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार पिल्लई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा सहायक आयुक्त (कौशल्य विकास) शैलेश भगत आणि एकस्टेप फाउंडेशनचे कार्यक्रम संचालक इकप्रित सिंग उपस्थित होते.