पश्चिम मुंबईतील सुमारे 185 शाळांची दोन वर्षांत तपासणीच नाही? आरटीआयमधून आरोप, शिक्षण विभागाच्या कारभारावर
वांद्रे ते दहिसर परिसरातील सुमारे 185 माध्यमिक शाळांची 2024-25 आणि 2025-26 या दोन शैक्षणिक वर्षांत तपासणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पश्चिम मुंबईतील वांद्रे ते दहिसर परिसरात असलेल्या सुमारे 185 माध्यमिक शाळांची गेल्या दोन शैक्षणिक वर्षांत, म्हणजे 2024-25 आणि 2025-26 मध्ये, तपासणीच झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या माहितीनंतर हा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दंडवते यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल केली आहे. पश्चिम मुंबईतील माध्यमिक शाळांच्या तपासणीबाबत आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याचा मुद्दाही या तक्रारीत मांडण्यात आला आहे.
शाळा संहितेतील नियम आणि शासन निर्णयांनुसार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांची नियमित तपासणी करणे अपेक्षित आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार शिक्षण निरीक्षकांनी वर्षाला 10 ते 15 शाळा तपासायच्या असतात, तर उपनिरीक्षकांनी 25 ते 30 शाळा तपासायच्या असतात. पण या कालावधीत शाळांची तपासणी झाली नाही, असा आरोप आहे.
तपासणीत सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छतागृहे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, विद्यार्थी पटसंख्या, भौतिक सुविधा आणि शाळांना मिळणाऱ्या अनुदानाचा वापर यांची पडताळणी करणे महत्त्वाचे असते. तपासणीच झाली नसेल, तर या सुविधा कोणत्या स्थितीत आहेत याबाबत प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमित तपासणी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
या प्रकरणी शिक्षण निरीक्षक (पश्चिम) संजय जावीर आणि संबंधित उपनिरीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तसेच सात दिवसांच्या आत सर्व संबंधित शाळांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, असेही त्यांनी म्हटले आहे. आता शिक्षण विभाग या आरोपांवर काय भूमिका घेतो आणि तपासणीचे अधिकृत अभिलेख काय सांगतात, याकडे लक्ष लागले आहे.