शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

विधान परिषदेतील पराभवानंतर महायुतीत धुसफूस, शिंदे म्हणाले "दोस्तीत कुस्ती नको"

विधान परिषदेतील पराभवानंतर महायुतीत धुसफूस, शिंदे म्हणाले "दोस्तीत कुस्ती नको" छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

विधान परिषद निवडणुकीत पाचपैकी दोनच जागा मिळाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात तणाव वाढला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना वाद वाढवू नका, असे सांगितले आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला पाचपैकी फक्त दोन जागा जिंकता आल्या. महाविकास आघाडीने तीन जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून भाजप आणि शिंदे गट यांच्यातला तणाव चांगलाच वाढला आहे.

भाजपच्या नेत्यांनी या निवडणुकीतला पराभव शिंदे सेनेमुळे झाला, असा आरोप केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि भाजपचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

अशा वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गुरूवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. "दोस्तीत कुस्ती नको", असे म्हणत त्यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांशी समन्वयाने वागायला सांगितले. निकालानंतर महायुतीत जो वाद निर्माण झाला आहे, तो वाढवू नका, असेही शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले.

शिंदे यांच्या सूचनांनुसार, या निकालाचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करायला हवे आणि चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. युतीत नाराजी येणार नाही आणि आपल्या वादाचा फायदा विरोधकांना होणार नाही, याची खबरदारीही आपणच घ्यायची आहे, असे त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना सांगितले.

महायुती म्हणून काम करताना या निवडणुकीत कोणत्या चुका झाल्या आणि कोणत्या त्रुटी राहिल्या, याचा सविस्तर अहवाल शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करू, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तूर्त पक्षाचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मित्रपक्षावर टीका करू नये, विसंवाद टाळावा आणि एकजुटीने पुन्हा कामाला लागावे, असेही शिंदे यांनी त्यांना सांगितले आहे.

दरम्यान, नवनाथ बन यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असे म्हटल्याचे सांगितले जाते की, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला, असा या मजकुराचा सूर आहे. सानप यांना मिळालेली मते पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत, असेही त्यात म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला आणि त्याचाही फटका बसला, असे त्यात मांडले आहे.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता, असे या मजकुरात म्हटले आहे. पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली, तसेच एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही, असेही त्यात म्हटले आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ