मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 19:28 IST

पुण्यात शिक्षक-पदवीधर मतमोजणीत गोंधळ: आठ मतपेट्यांना सील नाही, एका पेटीत इशाऱ्याची चिठ्ठी

बालेवाडीच्या क्रीडा संकुलात सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या दोन तासांतच सील तुटलेल्या मतपेट्यांवरून महाविकास आघाडीने आक्षेप घेतला, तर एका मतपेटीत शिक्षकाची हस्तलिखित चिठ्ठी सापडली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू झाली आहे. पण पहिल्या दोन तासांतच तिथे मोठा गोंधळ उडाला आणि राजकीय वादही पेटला. काही मतपेट्यांचे सील तुटलेले होते, तर एका मतपेटीतून थेट इशारा देणारी चिठ्ठी बाहेर आली.

मतमोजणी सुरू होताच बालेवाडी स्टेडियममधील केंद्रावर गडबड झाली. एकूण आठ मतपेट्यांना (बॅलेट बॉक्स) सील नव्हते किंवा त्यांच्या सुरक्षा तारा तुटलेल्या होत्या, हे महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या लक्षात आले. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख (राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार पक्ष) आणि त्यांच्या प्रतिनिधींनी यावर तीव्र आक्षेप घेतला आणि मतमोजणी थांबवण्याची मागणी केली.

या मुद्द्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ मतमोजणी थांबवावी लागली.

दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघाची मोजणी सुरू असताना टेबल क्रमांक 2 वर धक्कादायक प्रकार समोर आला. एका मतपेटीतून मतपत्रिकांसोबत एक हस्तलिखित चिठ्ठी निघाली. त्यात लिहिले होते, "आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. सन 2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा, नाहीतर बघा..."

पुरंदर तालुक्यातील राजेवाडी मतदान केंद्रावरील या पेटीत एका शिक्षकाने मतदानासोबत ही चिठ्ठी टाकल्याचे स्पष्ट झाले. किरण गोफणे यांनी हा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला, त्यानंतर ती चिठ्ठी जप्त करण्यात आली.

मतमोजणी केंद्रावरील या गोंधळावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे निकाल जाहीर होत आहेत. मतदान हे ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर झाले आहे! मग आज पराभव झाला तर विरोधक खापर फोडणार कशावर - मतपत्रिकेवर, निवडणूक आयोगावर की स्वतःच्या अपयशावर?"

उपाध्ये यांनी पुढे म्हटले, "निकाल अनुकूल लागला की लोकशाहीचा विजय आणि विरोधात गेला की आरोपांची राळ उडवायची, हा दुटप्पीपणा थांबला पाहिजे. विरोधकांनी पराभवासाठी नवी कारणे शोधण्यापेक्षा जनतेचा कौल स्वीकारण्याची हिंमत दाखवावी."

पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण 30 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे ही लढत रंगतदार झाली आहे. भारतीय जनता पार्टीकडून कौस्तुभ मुरलीधर गावडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. काँग्रेसचे जयंत आसगावकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार आहेत. सचिन सानप हे अपक्ष असून त्यांना शिवसेना - एकनाथ शिंदे गटाचा पाठिंबा आहे. दत्तात्रय सावंत हेही अपक्ष असून ते माजी आमदार आणि बंडखोर उमेदवार आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 47 उमेदवार आहेत. इथे चौरंगी किंवा तिहेरी चुरस असून महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. डॉ. स्मिता योगेश जाधव भाजपकडून (महायुती) लढत आहेत. हर्षदा देशमुख-जाधव राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाकडून (महाविकास आघाडी) उभ्या आहेत. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील मोदी हे बंडखोर उमेदवार आहेत.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ