शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

झांग शेंगमिन यांची थेट पॉलिटब्युरोवर नियुक्ती; शी जिनपिंग यांच्यानंतर सर्वात मोठे नाव

झांग शेंगमिन यांची थेट पॉलिटब्युरोवर नियुक्ती; शी जिनपिंग यांच्यानंतर सर्वात मोठे नाव छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराचे उप-कमांडर जनरल झांग शेंगमिन यांना अधिवेशनाची वाट न पाहता पॉलिटब्युरोचे सदस्य केले आहे.

चीनच्या राजकीय वर्तुळात सध्या जनरल झांग शेंगमिन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराचे उप-कमांडर असलेल्या शेंगमिन यांना कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्थेत, म्हणजे पॉलिटब्युरोमध्ये सदस्य म्हणून थेट घेतले आहे.

पॉलिटब्युरोचे सदस्य सहसा पक्षाच्या अधिवेशनात निवडले जातात. पुढचे अधिवेशन २०२७ मध्ये होणार आहे, पण शी जिनपिंग यांनी तोपर्यंत थांबण्याऐवजी शेंगमिन यांना आताच ही जबाबदारी दिली. या निर्णयामुळे शी जिनपिंग यांच्यानंतर झांग शेंगमिन हे चीनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत.

शेंगमिन हे सध्या चीनमधील एकमेव जनरल आहेत, ज्यांना उपराष्ट्रपतीपदाचा दर्जा आहे आणि जे पॉलिटब्युरोचेही सदस्य आहेत. गेल्या वर्षभरात चिनी सैन्यातल्या वरिष्ठ जनरल्सवर मोठी कारवाई झाली असून सातपैकी पाच जनरल्सना पदावरून हटवण्यात आले आहे. अशा उलथापालथीच्या काळात लष्करी आणि राजकीय यंत्रणेची कमान शेंगमिन यांच्याकडे दिल्याने आंतरराष्ट्रीय विश्लेषकही अवाक झाले आहेत.

शेंगमिन यांचा जन्म फेब्रुवारी १९५८ मध्ये शांक्सी प्रांतात झाला. वयाच्या २० व्या वर्षी ते चिनी सैन्यात दाखल झाले. सुरुवातीला ते एक सामान्य सैनिक म्हणून काम करत होते. २०१० मध्ये झालेल्या एका भीषण भूकंपाच्या वेळी त्यांनी मदतकार्य करणाऱ्या विशेष पथकाचे यशस्वी नेतृत्व केले. त्यामुळे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.

शी जिनपिंग २०१३ मध्ये चीनच्या सत्तेवर आल्यानंतर शेंगमिन यांना एकामागून एक मोठ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या आणि ते शी यांच्या अगदी जवळच्या, विश्वासू वर्तुळात गणले जाऊ लागले. सैन्यात खोलवर पसरलेला भ्रष्टाचार उपटून काढण्यासाठी शी जिनपिंग यांनी त्यांच्यावर लष्कराच्या शिस्तपालन समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी कडक पद्धतीने पार पाडली.

भ्रष्टाचारविरोधी समितीचे अध्यक्ष म्हणून शेंगमिन यांनी सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली. या कारवाईमुळे सात जनरल्सना आपली पदे गमवावी लागली. चिनी सैन्याचे उपाध्यक्ष झांग युशिया यांनाही याचा फटका बसला आणि त्यांना आपली नोकरी गमवावी लागली. या सगळ्यातून शेंगमिन यांची शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासक अशी ओळख तयार झाली.

यावर्षी त्यांची चीनच्या १९व्या केंद्रीय समितीचे सदस्य म्हणूनही निवड झाली होती. सध्या ६७ वर्षांचे असलेले झांग चिनी सैन्यात सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत. सैन्याच्या रचनेत राष्ट्रपती सर्वोच्च प्रमुख असतात आणि त्यानंतर उपराष्ट्रपतीपदाचा क्रमांक येतो. या पदावर सहसा दोन जण असतात, पण गेल्या सहा महिन्यांपासून झांग हे एकटेच हे पद सांभाळत आहेत. आता पॉलिटब्युरोमध्ये जागा मिळाल्याने त्यांचे प्रशासकीय आणि राजकीय वजन कैक पटीने वाढले आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ