नागपूर पदवीधर मतमोजणीच्या दिवशीच हायकोर्टात याचिका, दुबार मतदारांचा आरोप
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू असतानाच निवडणूक रद्द करण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज सुनावणी होणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी आज होत आहे. त्याच दिवशी ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे. या निवडणुकीतील उमेदवार सचिन काळबांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेतील आरोपानुसार, निवडणुकीच्या नियमाप्रमाणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी, निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करणे आवश्यक होते. पण ती यादी 6 ऑक्टोबरला न काढता 11 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली, असा आरोप आहे.
एवढेच नाही, तर शेवटच्या टप्प्यात 98 हजार मतदारांची नावे एकगठ्ठा मतदार यादीत जोडली गेली, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या मतदारांची पात्रता तपासली गेली नाही आणि घाईगडबडीत त्यांना यादीत टाकण्यात आले, असा आरोप आहे. त्यामुळे मतदार यादीची आणि मतदान प्रक्रियेची पारदर्शकता संपली, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
शेवटच्या टप्प्यात घाईत नावे जोडल्यामुळेच हजारोंच्या संख्येने दुबार मतदार तयार झाले आणि त्यातून बोगस मतदान झाले, असाही आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. आज दुपारी या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आता अंतिम टप्प्यात असताना न्यायालय या याचिकेला किती महत्त्व देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मतमोजणी कशी चालते, याची प्रक्रिया अशी आहे. सर्वात आधी प्रत्येक मतपेटीतील सर्व मते बाहेर काढली जातात. त्या मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याने फॉर्म नंबर 16 (1) मध्ये नमूद केलेली संख्या आणि प्रत्यक्षातील मतपत्रिका यांचा मेळ घातला जाईल. त्याच वेळी प्रत्येक मतपेटीतील मतांचे 25-25 चे गठ्ठे बनवले जातील. गठ्ठे बनवताना मतपत्रिकेची घडी उघडली जाणार नाही.
त्यानंतर सर्व गठ्ठे एका मोठ्या हौदात मिसळले जातील. म्हणजेच एकूण 1 लाख 65 हजार 541 मते हौदात एकत्र केली जातील. मग मतमोजणीच्या प्रत्येक टेबलावर 25-25 च्या गठ्ठ्यांच्या स्वरूपात 1000 मते मोजणीसाठी दिली जातील. नागपूरच्या मतमोजणीसाठी 84 टेबल असल्यामुळे पहिल्या फेरीत 84 हजार मते मोजणीसाठी येतील.
पहिल्या फेरीत प्रत्येक टेबलवरील 1000 मते उघडली जातील. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत असेल, ते त्या उमेदवाराच्या नावाच्या पिजन बॉक्समध्ये टाकले जाईल. हे उमेदवारांची नावे असलेले खर्ड्याचे छोटे बॉक्स असतात. याच वेळी अवैध मते बाजूला ठेवली जातील.
दुसऱ्या फेरीतही सर्व 84 टेबलांवर प्रत्येकी 1 हजार मते मोजण्यासाठी दिली जातील. पहिल्या फेरीसारखीच प्रक्रिया राबवून पहिल्या पसंतीनुसार मते उमेदवारांच्या पिजन बॉक्समध्ये टाकली जातील. दुसऱ्या फेरीच्या शेवटी सर्व अवैध मते वेगळी झाल्यामुळे विजयाचा कोटा निश्चित होईल.
पहिल्या दोन्ही फेऱ्यांत मिळून एखादा उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचला, तर निवडणूक आयोगाच्या परवानगीनुसार त्याला विजयी घोषित केले जाईल. पहिल्या पसंतीच्या मतांवर कोणीच कोट्यापर्यंत पोहोचला नाही, तर एलिमिनेशनची फेरी सुरू होईल. त्यात पहिल्या पसंतीच्या मतांनुसार सर्वात शेवटच्या उमेदवाराला बाद केले जाईल आणि त्याच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीची मते संबंधित उमेदवारांना हस्तांतरित केली जातील. एखादा उमेदवार विजयाचा कोटा गाठेपर्यंत एकेका उमेदवाराला बाद करत ही प्रक्रिया सुरू राहील.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.