मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 18:39 IST

नागपूर पदवीधर निकाल: कराळेंच्या रडतानाच्या व्हिडीओचा फायदा होणार का? भाजपच्या सर्व्हेत 15000 मते, काँग्रेसला

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि अपक्ष नितेश कराळे यांच्यात लढत असून दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरू शकतात.

नागपूर पदवीधर निकाल: कराळेंच्या रडतानाच्या व्हिडीओचा फायदा होणार का? भाजपच्या सर्व्हेत 15000 मते, काँग्रेसला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी आज सुरू झाली आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर अशा पाच ठिकाणी ही निवडणूक झाली. या पाचपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे.

या मतदारसंघात भाजपकडून सुधाकर कोहळे, काँग्रेसकडून अभिजीत वंजारी आणि अपक्ष म्हणून नितेश कराळे रिंगणात आहेत. मतदानाच्या काही तास आधी शरद पवार गटाने नितेश कराळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. पक्षाच्या या निर्णयामुळे कराळे प्रचंड दुखावले गेले. त्यांनी सोशल मीडियावर ओक्साबोक्सी रडतानाचा व्हिडीओ टाकला होता. कराळे मास्तरांच्या या भावनिक खेळीचा मतदानाच्या दिवशी त्यांना फायदा झाल्याची दाट शक्यता आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूरमध्ये 60 टक्के मतदान झाले. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली भागात मात्र 71 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. या भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे याच मतदानाच्या जोरावर पदवीधरच्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळू शकतो, असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे.

भाजप मात्र आपल्या विजयाबद्दल आश्वस्त आहे. या निवडणुकीत पक्षाने आखलेली रणनीती प्रत्यक्षात उतरवण्यात त्यांना यश आले होते आणि संपूर्ण पक्ष एकदिलाने मैदानात उतरला होता. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघेही प्रचारासाठी आले होते. याचा मतदारांवर निश्चितच प्रभाव पडला, असे भाजपला वाटते. शिवाय भाजपने आपापल्या आमदार आणि नगरसेवकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या, त्यामुळेही पक्षाला विजयाची खात्री आहे.

भाजपच्या प्राथमिक सर्व्हेत नितेश कराळे यांना पहिल्या पसंतीची 15000 मते मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हे 15000 मतदार दुसऱ्या पसंतीची मते कोणाला देणार, यावर नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल बदलू शकतो.

पहिल्या पसंतीच्या मतांवरच निकाल लागला, तर फार प्रश्न येणार नाही. पण विजयी उमेदवार ठरवण्यासाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली, तर प्रक्रिया क्लिष्ट होईल आणि मतमोजणी बराच काळ लांबेल. दुसऱ्या पसंतीची मते कोणाला जास्त मिळतील, याचा नेमका अंदाज कोणत्याही राजकीय पक्षाला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे निकाल लावण्याची वेळ आली, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ